आम्ही अपराजित नाही, लंकेला विजयाचे श्रेय : कोहली
By admin | Published: June 10, 2017 04:46 AM2017-06-10T04:46:01+5:302017-06-10T04:56:08+5:30
‘आम्ही मोठ्या धावा उभारल्या. गोलंदाजांनीही चांगला मारा केला. तथापि श्रीलंकेचे फलंदाज धडाकेबाज फलंदाजी करीत असतील आणि प्रत्येक संघ चांगला खेळ करीत असेल
लंडन : ‘आम्ही मोठ्या धावा उभारल्या. गोलंदाजांनीही चांगला मारा केला. तथापि श्रीलंकेचे फलंदाज धडाकेबाज फलंदाजी करीत असतील आणि प्रत्येक संघ चांगला खेळ करीत असेल तर विरोधी संघाला श्रेय द्यायलाच हवे. आम्ही अपराजित नाही,’ अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहली याने पराभवानंतर व्यक्त केली.
३२२ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने केवळ तीन गडी गमावून सहज गाठले. सामन्यानंतर कोहली म्हणाला,‘आम्ही सर्वच चॅम्पियन्स संघांविरुद्ध खेळत आहोत. आमची गोलंदाजी वाईट नव्हती पण विजयाचे श्रेय प्रतिस्पर्धी संघाला द्यावेच लागेल. सहकाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या फलंदाजांचे कौतुक करणे माझे कर्तव्य आहे. कुणी संघ अशा प्रकारच्या मानसिकतेतून क्रिकेट खेळत असेल, उत्कृष्ट फटकेबाजीचा नमुना पेश करीत असेल तर त्या संघाची प्रशंसा करणे आवश्यक आहे.’ श्रीलंकेने चमकदार कामगिरी केल्याचे कोहलीने कबूल केले. सध्याचा विजेता भारतासाठी आता द. आफ्रिकेविरुद्धचा सामना ‘करा किंवा मरा’ असाच असेल. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहे. यावर कोहली म्हणाला,‘हा सामना रोमहर्षक आहे. खऱ्या अर्थाने उपांत्यपूर्व लढत असेल. माझ्यामते सर्वच संघांना समान संधी आहे. या स्पर्धेशी जुळलेल्या प्रत्येकासाठी हा रोमहर्षक क्षण असेल. जो संघ वरचढ होईल तो उपांत्य फेरीत जाईल.’लंकेविरुद्ध भोपळा न फोडताच बाद झालेला कोहली म्हणाला,‘काल गोलंदाज अपयशी ठरले असे मी म्हणणार नाही. पण द. आफ्रिकेविरुद्ध रविवारी भरपाई मात्र केली जाईल, याबद्दल मी आश्वस्त करतो. आम्ही चांगल्या धावा काढल्या. पण आणखी वेगाने धावा काढू शकलो असतो.’(वृत्तसंस्था)
संगकाराच्या टीप्स विजयात मोलाच्या ठरल्या : मॅथ्यूज
कुमार संगकारा याने नेट्समधील सरावादरम्यान दिलेल्या प्रेरणादायी टीप्स चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारतावर नोंदविलेल्या विजयात मोलाच्या ठरल्याचे मत श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने व्यक्त केले आहे. सर्रेकडून खेळणारा संगकारा भारताविरुद्धच्या ‘करा किंवा मरा’ सामन्याआधी श्रीलंकेच्या युवा खेळाडूंसोबत सराव सत्रात सहभागी झाला होता. ८९ धावांची शानदार खेळी करणारा युवा फलंदाज कुसाल मेंडिस याला मार्गदर्शन केल्याबद्दल मॅथ्यूजने संगकाराचे आभार मानले. मॅथ्यूज म्हणाला,‘ फलंदाजीतील टीप्स घेण्यासाठी मेंडिस संगकाराला भेटला. त्याने काही टीप्स घेतल्या आणि मैदानावर प्रत्यक्ष या टीप्स कृतीत आणल्या.’