आम्ही महान मार्गदर्शक गमावला- हॉकी इंडिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:04 AM2020-05-26T00:04:20+5:302020-05-26T00:04:31+5:30
नवी दिल्ली : ‘बलबीरसिंग सिनियर यांच्या रूपाने आम्ही महान खेळाडू आणि मार्गदर्शक गमावला. त्यांची कारकीर्द भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ...
नवी दिल्ली : ‘बलबीरसिंग सिनियर यांच्या रूपाने आम्ही महान खेळाडू आणि मार्गदर्शक गमावला. त्यांची कारकीर्द भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरावे,’ या शब्दात शोक व्यक्त करीत हॉकी इंडियाने या दिवंगत खेळाडूला श्रद्धांजली अर्पण केली आहे. बलबीरसिंग यांच्या वयाच्या ९६ व्या वर्षी सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक यांनी, ‘बलबीर यांच्या रूपाने आम्ही मार्गदर्शक गमावला असून ते नेहमी हॉकीचे चाहते होते. त्यांचा सल्ला खेळासाठी नेहमी उपयुक्त ठरल्याचे सांगून बलबीर यांची उपलब्धी भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,’असा विश्वास व्यक्त केला.
हॉकी इंडियाचे महासचिव राजिंदरसिंग यांनी बलबीरसिंग यांच्या कामगिरीची कुणाशी तुलना करता येणार नसल्याचे आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
आंतरराष्टÑीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी, ‘बलबीरसिंग यांची महानता त्यांच्या खेळातून जाणवत होती. खेळातील कौशल्यासोबतच स्वभावातील स्रेहभाव आणि आदर या बळावर त्यांनी अनेकांची मने जिंकली. निवृत्तीनंतरही बलबीर यांची लोकप्रियता कायम होती, हे त्यांच्या सहजपणाचे उत्तम उदाहरण ठरले,’ या शब्दात त्यांना आदरांजली अर्पण केली.
याशिवाय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, माजी हॉकी कर्णधार अजितपालसिंग, गुरुबक्षसिंग, अशोककुमार, धनराज पिल्ले, वीरेन रासकिन्हा आणि सरदारसिंग, माजी कोच हरेंद्रसिंग, माजी कर्णधार पी. आर. श्रीजेश, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी फिरकीपटू हरभजनसिंग, कोच रवी शास्त्री, माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण, अॅथ्लीट पी. टी. उषा, नेमबाज हीना सिद्धू, मल्ल सुशील कुमार, योगेश्वर दत्त, बॉक्सर अखिल कुमार आदी भारतीय क्रीडा विश्वातील अनेक आजी-माजी खेळाडूंनी हॉकीच्या या महान सुपुत्राला श्रद्धांजली वाहिली. (वृत्तसंस्था)
‘महान आॅलिम्पिक हॉकीपटू बलबीरसिंग सिनियर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून वाईट वाटले. बलबीर हे दृढ इच्छाशक्ती, समर्पित वृत्ती आणि क्रीडा भावना जोपासणारे व्यक्तिमत्त्व होते. सर, तुमची नेहमी उणीव जाणवेल. तुम्ही आमच्यासाठी सदैव प्रेरणास्रोत असाल. भावपूर्ण श्रद्धांजली.’
-कॅप्टन अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री पंजाब