आम्ही गंभीरपणे टेनिस खेळतो : फेडरर
By admin | Published: December 13, 2015 11:20 PM2015-12-13T23:20:31+5:302015-12-13T23:20:31+5:30
सलग दोन वर्षे आयपीटीएलमध्ये शानदार खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने ही स्पर्धा प्रदर्शनीय स्पर्धा नसल्याचे ठाम मत व्यक्त केले.
नवी दिल्ली : सलग दोन वर्षे आयपीटीएलमध्ये शानदार खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने ही स्पर्धा प्रदर्शनीय स्पर्धा नसल्याचे ठाम मत व्यक्त केले. या स्पर्धेच्या भारत दौऱ्यामध्ये शनिवारी फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल या दोन बलाढ्य खेळाडूंमध्ये अटीतटीचा सामना झाला. या सामन्यानंतर फेडररने आपले मत मांडले.
ही स्पर्धा प्रदर्शनीय आहे का? या प्रश्नावर फेडररने आपले ठाम मत मांडले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रदर्शनीय सामना म्हणजे काय? आॅस्टे्रलियामध्ये किड्स डे प्रदर्शनीय सामना रंगतो, ज्यामध्ये तुम्ही खेळता आणि स्कूबी डूसह वेळही घालवता. मात्र ही स्पर्धा स्कूबी डू नाही, त्यामुळे आम्ही गंभीरतेने टेनिस खेळतो हे स्पष्ट आहे, अशा शब्दांत फेडररने मत व्यक्त केले. नदालविरुद्ध झालेल्या सामन्यासाठी सुमारे १५ हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. हे सर्व टेनिसप्रेमी होते. त्यामुळे मुळात प्रेक्षक कसे आहेत हे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपण याकडे कसे पाहतो यावरही खूप निर्भर असते. माझ्या मते हे अत्यंत गंभीर टेनिस आहे. त्याचबरोबर आपल्या संघातर्फे खेळताना थोडा आनंदही मिळतो, असेही फेडररने सांगितले.
या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असल्याने स्पर्धा आकर्षक झाली आहे. याबाबतीत फेडरर म्हणाला, की एका संघात अनेक दिग्गजांना खेळताना पाहणे शानदार आहे. इतक्या चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी मी त्यांचे कौतुक करतो. कारण ते ज्या प्रकारे खेळ करीत आहेत, त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागत आहे. वैयक्तिकरीत्या मला हे आवडते, त्यासाठी या स्पर्धेला प्रदर्शनीय म्हणा किंवा दुसरे काही, परंतु हे मजेदार आहे आणि यासाठीच मी पुन्हा येथे येणार. (वृत्तसंस्था)