आम्ही यंदा विजयी सुरुवात करू : रोहित शर्मा
By admin | Published: April 8, 2016 03:22 AM2016-04-08T03:22:35+5:302016-04-08T03:22:35+5:30
यंदाच्या आयपीएल नवव्या सत्रात आम्ही सुरुवातीलाच विजयी लय मिळविण्याचा निर्धार केला असून, पहिल्या सामन्यापासूनच विजयी कामगिरीचा आमचा प्रयत्न असेल.
मुंबई : ‘यंदाच्या आयपीएल नवव्या सत्रात आम्ही सुरुवातीलाच विजयी लय मिळविण्याचा निर्धार केला असून, पहिल्या सामन्यापासूनच विजयी कामगिरीचा आमचा प्रयत्न असेल. मागील दोन सत्रांत आमची सुरुवात अत्यंत निराशाजनक राहिली, मात्र यंदा चित्र वेगळे दिसेल,’ असा विश्वास गतविजेता आणि दोनवेळचा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.
मागील दोन सत्रांमध्ये मुंबई इंडियन्सने पहिले चार सामने गमावल्यानंतर बाद फेरी गाठली
होती. यावेळी मात्र सुरुवातीपासूनच विजयी लय मिळवण्याचा निर्धार कर्णधार रोहितने केला आहे.
९ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा मुंबई इंडियन्स वि. रायजिंग पुणे सुपरजायंट्स असा सलामीचा सामना रंगणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर रोहित म्हणाला की, ‘गत दोन सत्रांमध्ये सलामीचे चार सामने गमावल्यानंतर आम्ही विजयी मार्गावर आलो. त्यावेळी संघाने खूप मेहनत घेतली होती. यावेळी आमचे लक्ष सकारात्मक सुरुवात करण्यावर आहे. स्पर्धेतील विजयी सुरुवात अत्यंत महत्त्वाची आहे.’’
२०१४ मध्ये भारतातील निवडणुकीमुळे आयपीएल -७ चा पहिला पडाव संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यात आला होता. त्यावेळी पहिले ५ सामने गमावून अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर मुंबईकरांनी वानखेडे मैदानावर यशस्वी पुनरागमन करताना बाद फेरी गाठण्याचा पराक्रम केला, तर यानंतर २०१५ मध्ये पुन्हा एकदा सुरुवातीचे चार सामने गमावल्यानंतर मुंबईने जबरदस्त कमबॅक करताना थेट जेतेपदास गवसणी घातली.
‘टी-२० क्रिकेट अत्यंत वेगवान क्रिकेट असून, या प्रकारामध्ये लय महत्त्वाची आहे. त्यामुळेच चांगली सुरुवात निर्णायक ठरते. आम्ही यावर अधिक लक्ष केंद्रित केले असून, मागील चुका टाळण्याचा प्रयत्न आहे,’ असेही रोहितने यावेळी सांगितले.
> दुखापतीमुळे संघाचा हुकमी अस्त्र लसिथ मलिंगा स्पर्धेच्या पहिल्या सत्रात खेळणार नाही. तो सध्या संघासोबत नाही. जर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करायची असेल, तर पाचव्या सामन्याआधी हा निर्णय घ्यावा लागेल. गतस्पर्धेत मलिंगाने शानदार प्रदर्शन केले होते आणि तो जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. तसेच कर्णधार रोहित शर्माही आपल्या जुन्या अंदाजात खेळेल याचा विश्वास आहे. तो दर्जेदार फलंदाज असून, त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. सर्वोत्तम फॉर्म टिकवून ठेवणे कठीण असते. प्रत्येकाच्या खेळीत उतार - चढाव येत असतात. त्यामुळेच तो नक्कीच आपला सर्वोत्तम खेळ करेल याचा विश्वास आहे.
- रिकी पाँटिंग,
प्रशिक्षक, मुंबई इंडियन्स