मौसम खत्रीचे स्वप्न भंगले
By admin | Published: May 9, 2016 12:02 AM2016-05-09T00:02:25+5:302016-05-09T00:02:25+5:30
भारताचा मौसम खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न दुसऱ्या आणि अखेरच्या विश्व क्वालिफाइंग स्पर्धेत रविवारी फ्रीस्टाईल ९७ किलो वजन गटाच्या संघर्षपूर्ण सेमी फायनलमधील पराभवाबरोबरच भंगले.
इस्तंबूल : भारताचा मौसम खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न दुसऱ्या आणि अखेरच्या विश्व क्वालिफाइंग स्पर्धेत रविवारी फ्रीस्टाईल ९७ किलो वजन गटाच्या संघर्षपूर्ण सेमी फायनलमधील पराभवाबरोबरच भंगले. आता आॅगस्टमध्ये रिओ आॅलिम्पिकमध्ये ६ पैलवान भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे निश्चित झाले.
रिओ आॅलिम्पिकसाठी या अखेरच्या क्वालिफाइंग स्पर्धेच्या फ्रीस्टाईल गटात भारताचे तीन मल्ल सहभागी झाले होते. त्यातील दोन मल्ल गोपाल केदारनाथ यादव (८६ किलो) आणि हितेंदर (१२५ किलो) पहिल्याच फेरीत पराभूत झाले, तर मौसम खत्रीचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.
खत्रीला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता आणि उपउपांत्यपूर्व फेरीत त्याने ग्रीसच्या निकोलाओस पापोइकोनोमो याचा १०-० असा धुव्वा उडवला होता. उपांत्यपूर्व फेरीत खत्रीने जर्मनीच्या एरिक स्वेन थिएले याचे आव्हान ८-४ असे मोडीत काढले. उपांत्य फेरीत खत्रीची लढत मंगोलियाच्या खुदेरबुल्गा दोर्जखंड याच्याशी होती. मंगोलियाच्या मल्लाने संघर्षपूर्ण लढतीत खत्रीचा ८-६ असा पराभव करीत ती जिंकली. या पराभवाबरोबरच हरियानाच्या खत्री याचे रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न भंगले.
त्याआधी गोपाल केदारनाथ यादव याला ८६ किलो वजन गटात लातवियाच्या अर्मांडस् ज्विरबुलिस याने ५-४ अशा संघर्षपूर्ण लढतीत नमवले, तर १२५ किलो वजन गटात युक्रेनच्या ओलेक्सांद्र खोत्सियानीवस्कीने हितेंदरला क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ७-२ असे पराभूत केले.
आॅलिम्पिकसाठी या अखेरच्या पात्रता स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचे पाचही ग्रीकोरोमन पैलवान फ्लॉप ठरले होते. त्यातील चार जण तर एकही कुस्ती जिंकू शकले नव्हते, तर गुरप्रीतला वजन जास्त आढळल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. महिला गटात सहा मल्लांपैकी विनेशने ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकत आणि साक्षीने ५८ किलो वजन गटात रौप्यपदक जिंकताना देशाला आॅलिम्पिक कोटा मिळवून दिला होता.
रिओ आॅलिम्पिकसाठी भारताकडून संदीप तोमर (५७), योगेश्वर दत्त (६५ किलो), नरसिंह यादव (७४ किलो), ग्रीकोरोमन मल्ल हरदीप (९८ किलो), महिला मल्ल विनेश (४८) आणि साक्षी (५८) यांनी आॅलिम्पिक कोटा मिळवला होता.
२०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये अमित कुमार (५५ किलो), योगेश्वर दत्त (६०), सुशील कुमार (६६), नरसिंह यादव (७४) आणि गीता फोगट (५५) यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते.