‘वेट, व्हाईल वी कनेक्ट!’
By admin | Published: November 24, 2015 02:21 AM2015-11-24T02:21:33+5:302015-11-24T02:21:33+5:30
कायम ‘व्यवस्थे’च्या परिघावरच ताटकळत राहिलेले देशातले अनेक अंधारे कोपरे नव्या ‘कनेक्टिव्हिटी’ने जगाशी जोडले जातात, तेव्हा तिथली माणसे, त्यांच्या आकांक्षांना कसे धुमारे
कायम ‘व्यवस्थे’च्या परिघावरच ताटकळत राहिलेले देशातले अनेक अंधारे कोपरे नव्या ‘कनेक्टिव्हिटी’ने जगाशी जोडले जातात, तेव्हा तिथली माणसे, त्यांच्या आकांक्षांना कसे धुमारे (आणि प्रश्न) फुटतात, हे शोधत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा चारही दिशांना केलेल्या भारत-भ्रमंतीची अनोखी कहाणी रामनाथ गोएंका सन्मानाची मानकरी ठरली हा सन्मान आहे, ‘इंडिया’शी टक्कर देण्याची जोरदार तयारी चालवलेल्या ‘भारता’तल्या अस्सल हिमतीचा!
- ‘लोकमत’च्या टीमने हा प्रवास केला होता गेल्या वर्षी. दीपोत्सव या दिवाळी अंकासाठी! रिपोर्ताज हा प्रकार प्रामुख्याने वापरला जातो, तो एखाद्या सामाजिक प्रश्नाचा मुळातून वेध घेण्यासाठी! ‘दीपोत्सव’च्या टीमपुढे असा प्रश्न नव्हता. होता तो एका उत्तराचा शोध! सतत उन्नत आणि स्वस्त होत खोलवर झिरपणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या आधाराने ग्रामीण भागातल्या दुर्लक्षित जनतेने स्वत:साठी शोधलेल्या उत्तरांचा शोध! त्यासाठी देशाच्या चार कोपऱ्यांतले चार दुर्गम प्रांत निवडले गेले... आणि सुरू झाला एक विलक्षण प्रवास!
पूर्वेकडल्या इम्फाळच्या पोटातली दुर्गम खेडी, पश्चिमेकडल्या डोंगरउतारावरले आदिवासी पाडे, उत्तर प्रदेशातल्या रासवट खेड्यांमधले धूळभरले रस्ते आणि दक्षिणेच्या गर्द अंधाऱ्या जंगलात सौरऊर्जेच्या छत्र्या लावून झोपड्या उजळवून टाकणारे चेंचू.... या प्रवासात लोकमतच्या टीमने अनुभवले ‘माहिती’चा हात धरून वेगाने घडत असलेले एक स्थित्यंतर! देशातल्या ‘सिस्टीम’चे लक्ष जाण्याची वाट पाहाण्याला विटलेल्या गावकुसातल्या नागरिकांनी हवेतून अद्ृश्य रूपाने गावात पोचलेल्या स्पेक्ट्रमच्या लहरींवर बसून उडी घेण्याची तयारी चालवली आहे. मोबाइल आणि इंटरनेट तंत्रज्ञानाने या अंधाऱ्या कोपऱ्यांना जगाशी ‘कनेक्टिव्हिटी’ देऊ केली. त्यातून नवा आत्मविश्वास येतो आहे आणि आजवर मनात ठेवलेले प्रश्न विचारून आपले हक्क मिळवण्याची हिंमतही!
देशाचे भविष्यच बदलू घातलेल्या या स्थित्यंतराचा मागोवा घेणारी ही लेखमाला समीर मराठे, सुधीर लंके, दीप्ती राऊत आणि चित्रा अहेंथेम यांनी लिहिली होती.
अर्थमंत्री अरुण जेटलींनी
स्व. रामनाथ गोएंकांच्या आठवणी सांगतांना पत्रकारितेतल्या त्यांच्या धाडसी वृत्तीचे विविध किस्से ऐकवले. स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या धाडसी पत्रकारितेचा आणि रामनाथजींच्या जीवनातील संघर्षाचा इतिहास फारसा वेगळा नाही, असेही जेटली म्हणाले.
या दिमाखदार सोहळ्यास केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, नजमा हेपतुल्ला, माजी केंद्रीय मंत्री
पी. चिदंबरम, कपिल सिब्बल आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर विख्यात अभिनेते आमीर खान यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. त्यात आमीर खान यांनी देशातील असहिष्णुतेच्या वातावरणाच्या बहुचर्चित मुद्द्याला हात घातला. सरकारकडून नि:संदिग्ध आश्वासक प्रतिसाद मिळत नाही, हीच खरी अडचण असल्याचे ते म्हणाले. माझी पत्नी किरण आताशा मला एक प्रश्न विचारू लागली आहे. आपण देश सोडून जायला हवंय का, हा तिचा प्रश्न फारच गंभीर असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.