भारोत्तोलनपटूंना डॉक्टर, फिजिओची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:20 AM2018-08-08T04:20:40+5:302018-08-08T04:20:43+5:30
भारोतोलनपटूंना जखमांबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडा वैद्यकतज्ज्ञ तसेच फिजिओ यांची तातडीची गरज असल्याचे मत या खेळातील राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली: भारोतोलनपटूंना जखमांबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडा वैद्यकतज्ज्ञ तसेच फिजिओ यांची तातडीची गरज असल्याचे मत या खेळातील राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांनी व्यक्त केले आहे. मीराबाई चानूला जखमेमुळे आशियाईमधून माघार घ्यावी लागल्यानंतर अशाप्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय योजण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
मीराबाईच्या कमरेच्या दुखण्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहे. यासंदर्भात वृत्तसंस्थेशी बोलताना शर्मा म्हणाले, ‘आशियाई खेळण्याची जोखीम न पत्करता आॅलिम्पिक पात्रता तयारीवर लक्ष्य केंद्रित करण्याचा मीराबाईला सल्ला दिला होता. गेल्या आठ आठवड्यात तिने सरावदेखील केलेला नाही. आमच्यासाठी आॅलिम्पिक अधिक महत्त्वपूर्ण असल्याने कुठलीही जोखीम पत्करायची नाही. राष्टÑीय संघाला क्रीडा वैद्यकतज्ज्ञ आणि फिजिओ मिळाल्यास आमच्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळेल. यामुळे भविष्यात अशा घटना घडणार
नाहीत.’
गोल्ड कोस्ट राष्टÑकुल स्पर्धेत भारतीय संघासोबत फिजिओ नव्हता, असे निदर्शनास आणून देत शर्मा म्हणाले,‘तरीही आमच्या खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यावेळीही मीराबाईने फिजिओची गरज असल्याचे मीडियाशी बोलताना म्हटले होते.
मीराबाईच्या अनुपस्थितीतही भारतीय खेळाडू आशियाईमध्ये दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत शर्मा म्हणाले,‘मीराबाई खेळणार नाही, याबद्दल मी मानसिक तयारी केली होती, पण तिच्या अनुपस्थितीत इतर खेळाडू पदक विजेती कामगिरी करतील, याबद्दल मी आशावादी आहे.’ मीराबाईच्या पुनरागमनाच्या शक्यतेसंदर्भात विचारताच ते म्हणाले,‘मुंबईत तिच्यावर उपचार सुरू आहेत. मी सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात आहे. तिला जखम नाही. शिवाय अनेक एमआरआयमध्ये दुखण्याचा शोध लागलेला नाही. मी घाई न करता नोव्हेंबरमध्ये आयोजित आॅलिम्पिक पात्रता फेरीवर लक्ष्य केंद्रित करण्यास सांगितले आहे.’ (वृत्तसंस्था)
>विश्व दर्जाचे पदक विजेते भारोत्तोलक हवे असतील तर क्रीडा वैद्यक तज्ज्ञ तसेच फिजिओचे मार्गदर्शन आवश्यक आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले असले तरी नियुक्ती करण्याचा अधिकार आम्हाला नाही.आमच्याकडे कुठलाही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने गरज भासल्यास पतियाळा येथील साईच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.’’ - विजय शर्मा राष्टÑीय प्रशिक्षक