साक्षीच्या स्वागताचा दिल्ली, हरियाणात जल्लोष
By Admin | Published: August 24, 2016 04:43 PM2016-08-24T16:43:54+5:302016-08-24T17:37:17+5:30
रिओ आॅलिम्पिकची कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिचे मायदेशात आगमन होताच जल्लोषात स्वागत झाले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 : रिओ आॅलिम्पिकची कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिचे मायदेशात आगमन होताच जल्लोषात स्वागत झाले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे साक्षीची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. तिचे आईवडील आणि नातेवाईक देखील उपस्थित होते.
साक्षीने कांस्यपदक दाखवित चाहत्यांना अभिवादन केले. अनेक महिन्यानंतर आप्तेष्टांना पाहल्यिाने साक्षी काहीवेळ भावुक झाली होती. ती म्हणाली, मी वडिलांना बिलगले आणि त्यांना पदक दाखविले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझे कुटुंब फार भावुक आहे. मला पाहून त्यांना अत्यानंद झाला. मला प्रेरणा देणारे कुुटुंबीय, कोच आणि सहकारी मल्लांची मी आभारी आहे.
माझे कुटुंबीय आणि कोच यांनी स्वप्न साकार करण्यास फार मदत केली. सुशील आणि योगेश्वर दत्तसारख्या दिग्गजांनी मला
प्रेरणा दिली. भारताची ध्वजवाहक होणे माझ्यासाठी गौरवपूर्ण क्षण होता. राष्ट्रपती भवनात यंदा खेलरत्न मिळणार हा आनंद साक्षीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. ती म्हणाली, या पुरस्कारासाठी निवड होणे दुग्धशर्करा योगम्हणावा लागेल.
इतक्या आत्मीयतेने स्वागत केल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. हजारो लोकांनी माझा उत्साह वाढविल्याचे पाहून आनंद झाला. या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्यामुळे मी पदक जिंकू शकले. आॅलिम्पिक पदक जिंकणे माझे स्वप्न होते. त्यासाठी कठोर मेहनत घेतली. पदक मिळवल्यानंतर स्वप्नवत वाटत आहे. - साक्षी मलिक
---
हरियाणात पोहोचताच मिळाला अडीच कोटीचा चेक!
आलिम्पिक कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिला गृहराज्य हरियाणात पाय ठेवताच बुधवारी अडीच कोटी रुपयांचा चेक बक्षिसापोटी देण्यात आला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्यावतीने
साक्षीचे जंगी स्वागत करण्यात आले.
त्याआधी नवी दिल्लीत दाखल होताच विमानतळावर साक्षीच्या स्वागतासाठी हरियाणाचे अर्धे मंत्रिमंडळ उपस्थित होते. राज्याचे क्रीडामंत्री अनिल विज हे ५८ किलो फ्री स्टाईलमध्ये राज्याचे नाव उंचाविणाऱ्या साक्षीसोबत रिओमधून सोबत आले. बहादूरगड येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी अडीच कोटीचा चेक तिच्या सुपूर्द केला. या शिवाय बेटी बचाव, बेटी पढाओ या कार्यक्रमासाठी साक्षीला राज्याची ब्रॅण्डदूत देखील बनविण्यात आले.
साक्षीच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, रेल्वेत साक्षीला पदोन्नती मिळावी यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले जातील. आम्ही हरियाणा सरकारची क्लास वन नोकरी साक्षीसाठी राखीव ठेवली आहे. साक्षीने होकार कळविल्यास आम्ही तिच्या नोकरीचे आदेश काढू. साक्षीच्या मोखरा गावात राज्य सरकार क्रीडा नर्सरी आणि स्टेडियम उभारणार आहे.
भविष्यात ब्लॉक स्तरावर एक हजार कोचेसची नियुक्ती केली जाईल. २३ वर्षांच्या या कन्येचे बहादूरगड येथे पारंपरिक पगडी घालून स्वागत झाले. यानंतर साक्षीने वाटेत विविध ठिकाणी स्वागताचा स्वीकार केल्यानंतर ती स्वत:च्या मोखरा गावात पोहोचली. आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या हरियाणातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये दिले जाणार आहेत.