अझारेंकाविरुद्ध वेस्निनाचा अनपेक्षित पराभव
By admin | Published: July 6, 2017 01:44 AM2017-07-06T01:44:51+5:302017-07-06T01:44:51+5:30
फ्रान्सचा जो - विल्फ्रेड त्सोंगा, लक्समबर्गचा जाइल्स मुल्लर आणि स्पेनचा रॉबर्टो बटिस्टा अगुट या नामांकित खेळाडूंनी आपआपल्या
लंडन : फ्रान्सचा जो - विल्फ्रेड त्सोंगा, लक्समबर्गचा जाइल्स मुल्लर आणि स्पेनचा रॉबर्टो बटिस्टा अगुट या नामांकित खेळाडूंनी आपआपल्या सामन्यात विजय मिळवताना विम्बल्डनची विजयी सुरुवात केली. त्याचवेळी महिला गटामध्ये बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने अनपेक्षित निकाल लावताना रशियाच्या एलेना वेस्निना हिला नमवून स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. स्लोवाकियाच्या आठव्या मानांकीत डॉमनिका सिबुल्कोवा हिने अपेक्षित विजयी सलामी देताना अमेरिकेच्या जेनिफर ब्रेडीला नमवले.
त्सोंगाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना इटलीच्या सिमोन बोलेल्ली याला सरळ तीन सेटमध्ये ६-१, ७-५, ६-२ असे नमवले. दुसऱ्या सेटमध्ये कडवी लढत देत सिमोनने त्सोंगापुढे काहीसे आव्हान उभे केले. मात्र, अनुभवाच्या जोरावर दुसरा सेट अंतिम क्षणी जिंकल्यानंतर त्सोंगाने यानंतर पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत तिसरा सेट सहज जिंकताना पुढच्या फेरीत आगेकूच केली.
त्याचवेळी, मुल्लरला विजयी कूच करण्यासाठी झेक प्रजासत्ताकच्या लुकास रोसोलविरुद्ध ५ सेटपर्यंत झुंजावे लागले. तब्बल ३ तास ३७ मिनीटांपर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात मुल्लरने ७-५, ६-७(७-९), ४-६, ६-३, ९-७ अशी बाजी मारली. तसेच अगुटलाही पहिल्या फेरीत विजय मिळवण्यासाठी जर्मनीच्या पीटर गोजोवक्झीविरुध्द ६-२, ६-१, ३-६, ६-३ असे चार सेटपर्यंत झुंजावे लागले.
वेस्निनाच्या अनपेक्षित पराभवामुळे महिला गटाचा तिसरा दिवस गाजला. अझारेंकाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत कसलेल्या वेस्निनाचे आव्हान सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-३ असे परतावले. अझारेंकाच्या आक्रमक खेळापुढे वेस्निनाचा काहीच निभाव लागला नाही. त्याचवेळी, आठव्या मानांकीत व्हिबुलकोवाने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत सहज विजयी सलामी देताना अमेरिकेच्या ब्रेडीला ६-४, ६-४ असा स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.
निशिकोरीची सलामी
आशियाचा अव्वल खेळाडू जपानचा केई निशिकोरीने विजयी सलामी दिली खरी, परंतु यासाठी त्याला झुंजावे लागले. ३ तास १५ मिनीटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात निशिकोरीने युक्रेनच्या सर्जी स्टाखोवस्कीचा ६-४, ६-७(७-९), ६-१, ७-६(८-६) असा पाडाव केला.