पश्चिम जर्मनीचे दुसरे अजिंक्यपद
By Admin | Published: June 4, 2016 02:15 AM2016-06-04T02:15:30+5:302016-06-04T02:15:30+5:30
सहाव्या युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेचे स्वरूप बदलण्यात आले. सेमिफायनलचे दोन सामने वगळून गटातील अव्वल संघ थेट फायनलमध्ये गेल;
1980
सहाव्या युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेचे स्वरूप बदलण्यात आले. सेमिफायनलचे दोन सामने वगळून गटातील अव्वल संघ थेट फायनलमध्ये गेल; पण हे नवे स्वरूप प्रेक्षकांना तितकेसे रुचले नाही. आतापर्यंतच्या सर्व स्पर्धेत सर्वांत रटाळ अशी या स्पर्धेची संभावना केली गेली. रटाळ सामने आणि दंगल यामुळे ही स्पर्धा बदनाम झाली. यापूर्वीच्या स्पर्धेत दोन वर्षे चाललेल्या पात्रता फेरीतील अव्वल तीन संघ आणि यजमान संघ असे चार संघ उपांत्यफेरीत दाखल होत होते. पण, यावेळी पात्रता सामन्यातून एकूण आठ अव्वल संघ निवडण्यात आले. त्यांना दोन गटात विभागण्यात आले. प्रत्येक गटात चार संघ. त्यांच्यात गटातंर्गत सामने झाले. प्रत्येक संघ तीन सामने खेळला. दोन्ही गटातील अग्रस्थानावर असलेल्या संघांमध्ये थेट अंतिम सामना खेळवण्यात आला.
प्रेक्षकाअभावी स्टेडियम तर रिकामी पडलीच शिवाय टीव्ही दर्शकांनी सुद्धा या स्पर्धेकडे पाठ फिरविली. या स्पर्धेतील प्रेक्षकांची सरासरी उपस्थिती २४, ६७६ इतकी होती. पहिल्या स्पर्धेचा अपवाद वगळता ही उपस्थिती अतिशय कमी होती. विशेष म्हणजे, यजमान इटलीच्या सामन्यालाही प्रेक्षक येत नव्हते. बहुतांश संघांनी या स्पर्धेत बचावात्मक खेळाचे धोरण अवलंबल्यामुळे अनेक सामने रटाळ झाले. इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यातील सामन्यावेळी झालेल्या प्रेक्षकांमध्ये झालेल्या दंगलीमुळे या स्पर्धेवर मोठा कलंक लागला. मध्यंतराला काही मिनिटे शिल्लक असतानाच प्रेक्षकांमध्ये झालेल्या वादाने दंगलीचे स्वरूप घेतले. यावेळी पोलिसांनी अश्रुधराचा वापर करून ही दंगल आटोक्यात आणली. यामुळे सामना काही वेळ थांबविण्यातही आला होता.
पात्रता फेरीतून पश्चिम जर्मनी, झेकोस्लोव्हिया, नेदरलँड आणि ग्रीस (अ गट) तसेच बेल्जीयम, इटली, इंग्लंड आणि स्पेन (ब गट) हे आठ संघ पुढे आले. अ गटातून पाच गूण घेवून प. जर्मनी तर ब गटातून चार गुणांसह बेल्जियम अव्वल ठरले. नव्या नियमानुसार हे दोन्ही संघ फायनलमध्ये पोहचले.
२२ जून १९८0 रोजी रोम येथे झालेल्या अंतिम सामन्यात पश्चिम जर्मनीच्या होर्स्ट ऱ्हुबेश्चने दहाव्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. बेल्जियमकडून ७५व्या मिनिटाला बरोबरी झाली. पण, सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना होर्स्ट ऱ्हुबेश्चने दुसरा गोल करून जर्मनीला दुसऱ्यांदा युरोपियन चॅम्पियनशिपचा डब्बल बार उडवून दिला.