विंडीजचा विश्वविक्रमी पाठलाग
By admin | Published: January 12, 2015 02:51 AM2015-01-12T02:51:27+5:302015-01-12T02:51:27+5:30
ख्रिस गेलच्या आणखी एका धमाकेदार कामगिरीने वेस्ट इंडिजने रविवारी येथे खेळलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर ४ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला
जोहान्सबर्ग : ख्रिस गेलच्या आणखी एका धमाकेदार कामगिरीने वेस्ट इंडिजने रविवारी येथे खेळलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर ४ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. २३१ धावांचा पाठलाग करताना गेल आणि मार्लोन सॅम्युअल्स यांनी आफ्रिकेची शिकार केली आणि १९.२ षटकांत हे लक्ष्य पार करून विक्रम प्रस्थापित केला. या विजयाने वेस्ट इंडिजने २-० अशी आघाडी घेत मालिका खिशात टाकली.
आफ्रिकेचा कर्णधार फा ड्यु प्लेसिस याने ५६ चेंडूंत ११ चौकार व ५ खणखणीत षटकार खेचून ११९ धावांचा डोंगर रचला. डेव्हिड मिलरने (४७) त्याला साजेशी साथ देत तिसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली आणि याच बळावर आफ्रिकेने २० षटकांत ७ बाद २३१ धावा केल्या. मात्र, गेलच्या झंझावातासमोर हे सर्व नेस्तानाबुत झाले. गेलने ४१ चेंडूंत ९ चौकार व ७ षटकार खेचून ९० धावा चोपल्या. त्याला सॅम्युअल्सने ३९ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार खेचून ६० धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार डॅरेन सॅमीने केवळ ७ चेंडूंत नाबाद २० धावा करून विंडीजला १९.२ षटकांत २३६ धावा करून विजय मिळवून दिला.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम विंडीजने या सामन्यात केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी २००९मध्ये भारताने श्रीलंकेने ठेवलेल्या २११ धावा सहज पार केल्या होत्या. (वृत्तसंस्था)