विंडीज क्रिकेट बोर्ड निष्क्रिय, अविश्वसनीय!
By admin | Published: December 17, 2015 01:24 AM2015-12-17T01:24:47+5:302015-12-17T01:24:47+5:30
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड निष्क्रिय तसेच अविश्वसनीय झाले असून, पदाधिकाऱ्यांची मनमानी वाढली आहे. खेळाडूंना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने विंडीज क्रिकेट रसातळाला जात
किंग्स्टन : वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड निष्क्रिय तसेच अविश्वसनीय झाले असून, पदाधिकाऱ्यांची मनमानी वाढली आहे. खेळाडूंना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने विंडीज क्रिकेट रसातळाला जात असल्याची टीका माजी महान वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग तसेच माजी कर्णधार ड्वेन ब्राव्हो यांनी केली आहे.
विंडीज बोर्डाच्या कार्यशैलीवर नेम साधताना होल्डिंग म्हणाले, ‘‘पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रिय आणि अविश्वसनीय वृत्तीमुळे क्रिकेटचे नुकसान झाले. पुढील नुकसान टाळण्यासाठी बोर्डात आमूलाग्र बदल व्हायला हवेत. बोर्डातील सध्याचे पदाधिकारी, त्यांची कार्यशैली आणि खेळाडूंसोबतची वागणूक आडमुठेपणाची राहील तोपर्यंत स्थिती आणखी खालावत जाईल, यात शंका नाही. बोर्डाचे संचालनकर्ते चांगले नसतील, तर उत्तम प्रशासन आणि पारदर्शी कारभाराची आशा बाळगता येणार नाही.’’
विंडीज संघ होबार्ट कसोटीत आॅस्ट्रेलियाकडून १ डाव २१२ धावांनी पराभूत झाला. त्यानंतर शनिवारी सेंट ल्युसिया येथे विंडीज बोर्डाची त्रैमासिक बठक झाली; पण बोर्डाने पराभवावर कुठलीही चिंता दर्शविली नव्हती. कॅरेबियन समुदायानेदेखील क्रिकेट बोर्डाला ‘जुनाट’, ‘अविकसित’, ‘तानाशाही कारभार करणारा’ असे संबोधून बोर्ड बरखास्त करण्याची मागणी केली.
माजी कर्णधार ब्राव्हो म्हणाला, ‘‘पदाधिकाऱ्यांचे खेळाडूंसोबतचे संबंध मधुर नाहीत. याशिवाय, पायाभूत सुविधादेखील पुरविल्या जात नाहीत. आमच्या देशात क्रिकेटवर राजकारणाचा पगडा आहे. आमच्याकडे अनेक शानदार खेळाडू आहेत; पण राजकारणाने खेळाची ‘वाट’ लावली. ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते खेळाच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात. खेळाडूंसाठी उत्कृष्ट मैदान, नेट आणि अकादमी असे काहीच नाही.
कामगिरी ढासळण्याला या गोष्टी जबाबदार ठरतात. खेळाडू, पदाधिकारी आणि व्यवस्थापन यांच्यात परस्पर विश्वास आणि समन्वय तसेच प्रामाणिकवृत्ती असेल तरच प्रगती शक्य होईल.’’
विंडीज बोर्ड आणि खेळाडूंमध्ये फुटीची ठिणगी पडण्यामागे विंडीज संघाची भारत दौऱ्यातून अर्ध्यातून माघार, हे कारण दिले जाते. त्या वेळी ब्राव्हो कर्णधार होता. विंडीज संघ भारतातून मायदेशात दाखल
होताच ब्राव्होकडून नेतृत्व
काढून घेण्यात आले. नंतर विश्वचषकासाठी त्याला संघातही स्थान देण्यात आले नव्हते. ब्राव्होने जानेवारीत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.(वृत्तसंस्था)