विंडीजने पाकिस्तानला नमवले
By admin | Published: November 4, 2016 04:18 AM2016-11-04T04:18:44+5:302016-11-04T04:18:44+5:30
नाबाद ८७ धावांच्या विजयी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडीजने पाकिस्तानचा तिसऱ्या कसोटी सामन्यात ५ विकेट्सने पराभव केला
शारजाह : सलामीवीर क्रेग ब्रेथवेट (६०*) आणि शेन डोवरिच (६०*) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद ८७ धावांच्या विजयी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडीजने पाकिस्तानचा तिसऱ्या कसोटी सामन्यात ५ विकेट्सने पराभव केला. विशेष म्हणजे या विजयासह विंडीज संघाने १४ सामन्यांनंतर आपला पहिला विजय मिळवला. तर, पाकिस्तानने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.
तिसऱ्या व अंतिम कसोटीत १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने चौथ्या दिवशी ५ बाद ११४ धावांची मजल मारली. अखेरच्या दिवशी ३९ धावांची आवश्यकता असताना ब्रेथवेट-डोवरिच यांनी नाबाद राहताना संघाच्या पराभवाची मालिका खंडित केली. विंडीजने ४३.५ षटकांत ५ बाद १५४ धावा काढल्या.
पहिल्या डावात नाबाद १४२ धावा काढणाऱ्या ब्रेथवेटने दुसऱ्या डावातही नाबाद अर्धशतक झळकावताना विंडीजच्या विजयात निर्णायक कामगिरी केली. त्याला सातव्या क्रमांकावरील डावरिचने मोलाची साथ दिली.पाकिस्तानला पहिल्या डावात २८१ धावांवर उखाडल्यानंतर विंडीजने ३३७ धावा काढून ५६ धावांची आघाडी घेतली. यानंतर पाकिस्तानने २०८ धावा उभारून विंडीजला १५३ धावांचे लक्ष्य दिले. क्रेग ब्रेथवेटला या वेळी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
>संक्षिप्त धावफलक :
पाकिस्तान (पहिला डाव) :
सर्व बाद २८१ धावा.
वेस्ट इंडीज (पहिला डाव) :
सर्व बाद ३३७ धावा.
पाकिस्तान (दुसरा डाव) :
सर्व बाद २०८ धावा.
वेस्ट इंडीज (दुसरा डाव) :
४३.५ षटकांत ५ बाद १५४ धावा
(क्रेग ब्रेथवेट नाबाद ६०, शेन डोवरिच नाबाद ६०; यासिर खान ३/४०)