वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत
By admin | Published: March 26, 2016 02:21 AM2016-03-26T02:21:47+5:302016-03-26T02:21:47+5:30
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत माजी विजेत्या वेस्ट इंडिजने बलाढ्य द. आफ्रिकेला तीन गड्यांनी पराभूत करीत शुक्रवारी टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली.
- किशोर बागडे, नागपूर
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत माजी विजेत्या वेस्ट इंडिजने बलाढ्य द. आफ्रिकेला तीन गड्यांनी पराभूत करीत शुक्रवारी टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. उत्कृष्ट गोलंदाजी आणि शानदार क्षेत्ररक्षणाच्या बळावर द. आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १२२ धावांवर रोखल्यानंतर वेस्ट इंडिजने विजयी लक्ष्य १९.४ षटकांत ७ बाद १२३ धावा करीत गाठले.
व्हीसीएच्या जामठास्थित खेळपट्टीवर विजयाचा पाठलाग करणाऱ्या विंडीजचीही सुरुवातीला दमछाक झाली. ख्रिस गेल (४) आणि फ्लेचर(११) लवकर बाद होताच विंडीजची स्थिती २ बाद ३४ होती. मर्लोन सॅम्युअल्सने चिवट खेळी करीत सहा चौकारांसह ४४ चेंडूत सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले. सलामीवीर जॉन्सन चार्ल्सने दोन चौकार आणि एका षटकारासह ३२ धावा केल्या. विंडीजने १६ षटकांत ४ बाद ९९ धावा केल्या होत्या. १७ व्या षटकांत फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने सलग दोन चेंडूवर रसेल आणि कर्णधार सॅमी यांना बाद करीत आणखी चुरस निर्माण केली. पुढच्या षटकांत केवळ तीन धावा निघाल्याने विंडीजच्या गोटात खळबळ माजली. अखेरच्या दोन षटकांत २० धावांची गरज होती आणि सॅम्युअल्स खेळपट्टीवर होता. त्याने थर्डमॅनला दोन चौकार ठोकून सामना संपविण्याकडे वाटचाल केली. त्याच षटकांत डिव्हिलियर्सने त्याचा झेल टिपला. अखेरच्या षटकात विंडीजला नऊ धावांचे आव्हान होते. रबाडाचा पहिला चेंडू ब्रेथवेटला निर्धावखेळला. पुढच्या चेंडूवर त्याने षटकार खेचला. रबाडाने पुढचा चेंडू वाईड टाकल्यानंतर ब्रेथवेटने एक धाव घेतली. स्ट्राईक रामदीनकडे आला. त्याने मारलेला चेंडू अमलाच्या हाताला चाटून जाताच विंडीजचा विजय साकार झाला. द. आफ्रिकेकडून ताहिरने दोन गडी बाद केले. याआधी आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, आणि ख्रिस गेल यांची अप्रतीम गोलंदाजी तसेच साजेशा सुरेख क्षेत्ररक्षणाच्या बळावर वेस्ट इंडिजने द. आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १२२ धावांत सहज रोखले.
सलामीवीर क्वींटन डिकॉकने ४६ चेंडूत सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले. तीन चौकार आणि एक षटकार खेचणाऱ्या डीकॉकने सहाव्या गड्यासाठी डेव्हिड व्हिसेसोबत सहाव्या गड्यासाठी ७.२ षटकांत अर्धशतकी भागीदारी करीत आफ्रिकेच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. १६ व्या षटकांत रसेलने त्याला त्रिफळाबाद केले. डेव्हिड व्हिसेने दोन चौकारांसह २६ चेंडूत २८ धावा केल्या. बोव्होच्या चेंडूवर कर्णधार सॅमीने त्याचा झेल टिपताच धावांचा वेग मंदावला.
ग्रूप १ मध्ये विंडीजला चौथा सामना आधीच स्पर्धेबाहेर पडलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध रविवारी येथेच खेळायचा आहे. दुसरीकडे पराभवानंतर द. आफ्रिका संघ संकटात सापडला आहे. तीन सामन्यात दोन पराभव पचवावे लागणाऱ्या आफ्रिका संघाची श्रीलंकेविरुद्ध २८ मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात परीक्षा राहील. त्याआधी इंग्लंडने श्रीलंकेला आज शनिवारी होणाऱ्या सामन्यात नमविल्यास द. अफ्रिकेला घरचा रस्ता धरावा लागू शकतो.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका : २० षटकांत ८ बाद १२२ धावा (क्विंटन डिकॉक ४७, डेव्हिड व्हिसे २८, ख्रिस्टोफर मॉरिस नाबाद १६; ख्रिस गेल ३-०-७-२, ड्वेन ब्राव्हो ४-०-२०-२, आंद्रे रसेल ४-०-२८-२) पराभूत वि. वेस्ट इंडिज : १९.४ षटकांत ७ बाद १२३ धावा (मर्लोन सॅम्युअल्स ४३, जॉन्सन चार्ल्स ३२; इम्रान ताहिर ४-०-१३-२)