वेस्ट इंडिजचा ‘आॅसी’ला दणका
By admin | Published: June 15, 2016 05:16 AM2016-06-15T05:16:55+5:302016-06-15T05:16:55+5:30
मार्लेन सॅम्युअल्सने झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने तिरंगी एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत जगज्जेत्या आॅस्टे्रलियाला ४ विकेट्सने लोळवले.
सेंट कीट्स : मार्लेन सॅम्युअल्सने झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने तिरंगी एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत जगज्जेत्या आॅस्टे्रलियाला ४ विकेट्सने लोळवले. आॅस्टे्रलियाने दिलेल्या २६६ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने ६ फलंदाजांच्या मोबदल्यात ४५.४ षटकांतच विजयी लक्ष्य पार केले.
वॉर्नर पार्क येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून विंडीजने आॅसी संघाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. आॅसीने निर्धारित ५० षटकांत ७ बाद २६५ धावांची समाधानकारक मजल मारली.
यानंतर आक्रमक सुरुवात केलेल्या विंडीजला रोखण्यात अपयशी ठरल्याने आॅसीला पराभवास सामोरे जावे लागले.
धावांचा पाठलाग करताना जॉन्सन चार्ल्स (४८) आणि आंद्रे फ्लेचर (२७) यांनी ७४ धावांची सलामी देत विंडीजला आक्रमक सुरुवात करून दिली. दोन्ही सलामीवीर ४ षटकांच्या अंतराने बाद झाल्यानंतर विंडीजचा डाव २ बाद ८५ असा घसरला. मात्र ड्वेन ब्रावो (३९) आणि सॅम्युअल्स (९२) यांनी संघाला सावरले. या दोघांनी ८२ धावांची भागीदारी केली. ब्रावो बाद झाल्यानंतर सॅम्युअल्सने खिंड लढवताना शानदार अर्धशतक झळकावताना संघाला विजयी मार्गावर आणले.
सॅम्युअल्सने ८७ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ९२ धावा फटकावल्या. दिनेश रामदिन (२९) आणि केरॉन पोलार्ड (नाबाद १६) यांनी छोटेखानी फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्का
मारला. अॅडम झम्पा आणि नॅथन कुल्टर-नाइल यांनी प्रत्येकी २ बळी घेत विंडीजला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. जेम्स फॉल्कनरने एक बळी घेतला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर उस्मान ख्वाजा, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जॉर्ज बेली या त्रयीने झळकावलेल्या अर्धशतकच्या जोरावर आॅसीने अडीचशेचा पल्ला पार केला. ख्वाजाचे शतक केवळ २ धावांनी हुकले. त्याने १२३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ९८ धावा फटकावल्या. स्मिथने ९५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ७४ धावा केल्या. तर बेलीने ५६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांचे
योगदान दिले. जेसन होल्डर, कार्लोस ब्रेथवेट आणि केरॉन पोलार्ड
यांनी प्रत्येकी २ बळी घेत
आॅसी संघाच्या धावफलकाला
ब्रेक मारला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
आॅस्टे्रलिया : ५० षटकांत ७ बाद २६५ धावा (उस्मान ख्वाजा ९८, स्टीव्ह स्मिथ ७४, जॉर्ज बेली ५५; केरॉन पोलार्ड २/३२, जेसन होल्डर २/४४, कार्लोस ब्रेथवेट २/६०) पराभूत वि. वेस्ट इंडिज (मार्लेन सॅम्युअल्स ९२, जॉन्सन चार्ल्स ४८; अॅडम झ्म्पा २/६०, नॅथल कुल्टर-नाइल २/६७)