वेस्ट इंडिजच्या महिला संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकला
By admin | Published: April 3, 2016 04:15 PM2016-04-03T16:15:35+5:302016-04-03T18:46:23+5:30
ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवत वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० महिला विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.
Next
कोलकाता, दि. ३- ईडन गार्डन्सवर झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवत आयसीसी टी-२० महिला विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. शेवटच्या वीसाव्या षटकात तीन चेंडू राखून १९.३ षटकात ऑस्ट्रेलियाने दिलेले १४९ धावांचे लक्ष्य पार केले.
वेस्ट इंडिजची सलामीवीर हॅले मॅथ्यूज आणि कर्णधार स्टाफॅनी टेलरने विजयाची पायाभरणी केली. मॅथ्यूजने ६६ तर, टेलरने ५९ धावांची खेळी केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. डॉटिनने नाबाद १८ आणि कूपरने नाबाद ३ धावा केल्या. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी तीन धावांची आवश्यकता होती.
ऑस्ट्रेलियाची पेरी गोलंदाजी करत होती. पहिल्या चेंडूवर डॉटिनने एक धाव घेतली त्यानंतर कूपरला दुसरा चेंडू निर्धाव टाकला. तिस-या चेंडूवर कूपर आणि डॉटिनने चोरटी धाव घेतली त्यावेळी धावबाद करण्याच्या प्रयत्नात ओव्हर थ्रो झाला आणि कूपर आणि डॉटिनने दुसरी धाव घेत वेस्ट इंडिजच्या वर्ल्डकप विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या महिला संघाने मैदानात धाव घेत विजेतेपदाचा आनंद साजरा केला.
आयसीसी महिला टी २० वर्ल्डकपमधल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
सलामीवीर विलानी (५२) आणि लानिंग (५२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारीत वीस षटकात पाच बाद १४८ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून डॉटीनने दोन तर, मॅथ्यूज आणि अनिसा मोहम्मदचे प्रत्येकी एक गडी बाद केला.