लेव्हिसच्या शतकाने विंडीज विजयी
By Admin | Published: July 10, 2017 01:22 AM2017-07-10T01:22:53+5:302017-07-10T01:22:53+5:30
११२ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने रविवारी खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा ९ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला.
किंग्स्टन : एव्हिन लेव्हिसची (नाबाद १२५ धावा, ६२ चेंडू, ६ चौकार, १२ षटकार) शतकी खेळी व त्याने मार्लोन सॅम्युअल्ससह (नाबाद ३६) दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११२ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने रविवारी खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा ९ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला. भारताने ६ बाद १९० धावांची दमदार मजल मारली होती. विंडीजने विजयासाठी आवश्यक धावा १८.३ षटकांत एक गडी गमावित पूर्ण केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांची पाटी कोरीच राहिली. कुलदीपने ख्रिस गेलला (१८) माघारी परतवले.
त्याआधी, आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने ६ बाद १९० धावांची दमदार मजल मारली. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आल्यानंतर विराट कोहली (३९ धावा, २२ चेंडू) आणि शिखर धवन (२३ धावा, १२ चेंडू) यांनी सलामीला ६४ धावांची भागीदारी करीत चांगली सुरुवात करून दिली. तीन चेंडूंच्या अंतरात हे दोघेही माघारी परतल्यानंतर दिनेश कार्तिक (४८ धावा, २९ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार) आणि ऋषभ पंत (३८ धावा, ३५ चेंडू) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. रवींद्र जडेजा (नाबाद १३) व रविचंद्रन अश्विन (नाबाद ११) यांनी संघाला १९० धावांची मजल मारून दिली. विंडीजतर्फे जेरोम टेलर व केसरिक विलियम्स यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
>संक्षिप्त धावफलक
भारत :- विराट कोहली झे. नरेन गो. विलियम्स ३९, शिखर धवन धावबाद २३, ऋषभ पंत झे. वालटन गो. टेलर ३८, दिनेश कार्तिक त्रि. गो. सॅम्युअल्स ४८, महेंद्रसिंग धोनी झे. सॅम्युअल्स गो. टेलर ०२, केदार जाधव झे. नरेन गो. विलियम्स ०४, रवींद्र जडेजा नाबाद १३, रविचंद्रन अश्विन नाबाद ११. अवांतर (१२). एकूण २० षटकांत ६ बाद १९०. गोलंदाजी : बद्री ४-०-३१-०, टेलर ४-०-३१-२, विलियम्स ४-०-४२-२, ब्रेथवेट २-०-२६-०, नरेन ३-०-२२-०, सॅम्युअल्स ३-०-३२-१.
वेस्ट इंडिज :- ख्रिस गेल झे. धोनी गो. कुलदीप १८, एव्हिन लेव्हिस नाबाद १२५, मार्लोन सॅम्युअल्स नाबाद ३६. अवांतर (१५). एकूण १८.३ षटकांत १ बाद १९४. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-२७-०, अश्विन ४-०-३९-०, शमी ३-०-४६-०, कुलदीप ४-०-३४-१, जडेजा ३.३-०-४१-०.