पश्चिम रेल्वेचे धमाकेदार विजेतेपद
By admin | Published: November 11, 2016 05:02 AM2016-11-11T05:02:00+5:302016-11-11T05:02:00+5:30
बलाढ्य पश्चिम रेल्वे (मुंबई विभाग) संघाने आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर तुल्यबळ हरयाणा इलेव्हन संघाला ४-२ असे लोळवत ३३व्या सुरजीत हॉकी स्पर्धेच्या महिला गटाचे जेतेपद पटकावले.
जालंधर : बलाढ्य पश्चिम रेल्वे (मुंबई विभाग) संघाने आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर तुल्यबळ हरयाणा इलेव्हन संघाला ४-२ असे लोळवत ३३व्या सुरजीत हॉकी स्पर्धेच्या महिला गटाचे जेतेपद पटकावले.
आॅलिम्पियन सुरजीत हॉकी स्टेडियमवर बुधवारी रात्री झालेल्या या सामन्यात पश्चिम रेल्वेच्या महिलांनी आक्रमक खेळ करताना हरयाणा संघावर जबरदस्त वर्चस्व राखले. या शानदार कामगिरीसह पश्चिम रेल्वेने एक लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह चषकावर कब्जा केला. तर, उपविजेत्या हरयाणाला चषकासह ७५ हजार रुपयांच्या पारितोषिकावर समाधान मानावे लागले.
आक्रमक सुरुवात केलेल्या पश्चिम रेल्वेने पहिल्या सत्रात दबदबा राखला. १४व्याच मिनिटाला अनूपा बारला हिने अप्रतिम मैदानी गोल करुन रेल्वेला १-० अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. यानंतर पुन्हा एकदा ३४व्या मिनिटाला अनूपाने हरयाणाच्या क्षेत्रात मुसंडी मारताना आणखी एक मैदानी गोल करुन संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. या दमदार दोन गोलांच्या जोरावर रेल्वेने मध्यंतराला एकहाती वर्चस्व राखले.
विश्रांतीनंतर हरयाणाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. जसप्रीत कौरने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना ४०व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल साकारला. यानंतर दोन मिनिटांनी पश्चिम रेल्वेच्या मिअंगबम लिली चानू हिने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन संघाची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. हरयाणा देखील सहजासहजी हार मानण्यास तयार नव्हते. ५०व्या मिनीटाला नेहाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन संघाची पिछाडी २-३ अशी कमी केली. यावेळी हरयाणा कडवी टक्कर देणार अशी शक्यता होती. परंतु, ६८व्या मिनिटाला रेल्वेच्या मनजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर वेगवान गोल करताना संघाच्या विजयावर ४-२ असा शिक्कामोर्तब केला. (वृत्तसंस्था)