कोरोनानंतर कसे असेल क्रीडाविश्व
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:36 AM2020-04-27T03:36:09+5:302020-04-27T06:55:29+5:30
खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्यासारखाच राहील? यासारख्या अनेक प्रश्नांवर वृत्तसंस्थेच्यावतीने देशभरातील दिग्गज खेळाडूंशी चर्चा करण्यात आली. यावर अनेकांची मते संमिश्र राहिली.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर विजय मिळवल्यानंतर प्रेक्षक पुन्हा स्टेडियममध्ये येतील? परदेशात सराव करणे पहिल्यासारखे सोपे असेल? अशा खेळांचे काय होईल, ज्यात सामाजिक अंतर राखता येणार नाही? कोरोनातून सावरल्यानंतर खेळ आणि खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्यासारखाच राहील? यासारख्या अनेक प्रश्नांवर वृत्तसंस्थेच्यावतीने देशभरातील दिग्गज खेळाडूंशी चर्चा करण्यात आली. यावर अनेकांची मते संमिश्र राहिली.
सचिन तेंडुलकर (क्रिकेटपटू)
नक्कीच संपूर्ण जग आज सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहे. माझ्या मते चेंडूला थुंकी लावताना खेळाडू काही काळ सतर्क राहतील. ही गोष्ट कायम त्यांच्या लक्षात राहील.
अभिनव बिंद्रा (नेमबाज)
खेळ लोकांना एकमेकांशी जोडतात. शिवाय जगभरात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात खेळांचे योगदान असते. भविष्यात सुरक्षा आणि संरक्षणावर अधिक लक्ष दिले जाईल, मात्र खेळांप्रति असलेले आकर्षण कधीच कमी होणार नाही. कोरोनानंतरची परिस्थिती भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. कदाचित अनेक विदेशी स्पर्धा आणि शिबिरे होणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये भारताला क्रीडा पाया मजबूत करण्याची संधी मिळू शकते.
बजरंग पुनिया (मल्ल)
कुस्ती शारीरिक संपर्कवाला खेळ आहे. कुस्तीमध्ये तुम्ही कोणत्याही शारीरिक संपर्काला टाळू शकत नाही. मात्र माझ्या मते यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. मला या खेळामध्ये कोणत्याही बदलाची शक्यता दिसत नाही. सामने नक्कीच अधिक अटीतटीचे होतील. सर्व खेळाडू मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करतील.
मेरी कोम (बॉक्सर)
सर्व प्रकारच्या गोष्टी पहिल्यासारख्या सुरू होण्यासाठी प्रार्थना करत आहे. हा विषाणू सर्वांचा शत्रू असून याला कुणीही समजू शकलेला नाही. खेळांमध्ये बदल होतील. माझा खेळात शारीरिक संपर्क होतो आणि वैयक्तिकरीत्या मी चिंतित आहे की, आम्ही ही अडचण कशी टाळू शकतो. माझ्या मते सरावही वैयक्तिक होऊ शकतो. प्रेक्षकांच्या बाबतीत म्हणायचे, तर ते सामने पाहण्यास येतील. एक नक्की की, स्पर्धेत स्वच्छतेचा स्तर खूप उंचावेल.
बायचुंग भुतिया (फुटबॉलपटू)
आजच्या युगात टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्या आयुष्याचे महत्त्वाचे भाग आहेत आणि यामुळे स्टेडियममधील प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे क्रीडा व्यवसाय प्रभावित होईल, असे मला वाटत नाही. उलट यामुळे टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मला अधिक फायदा होईल.