व्हीलचेअरवरून उठून दीपाची सुवर्णपदकाला गवसणी; जिम्नॅस्टिक्सच्या राणीची फिनिक्सभरारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 06:40 PM2018-07-09T18:40:58+5:302018-07-09T18:41:37+5:30
धोका पत्करल्याशिवाय आयुष्यात मोठे यश मिळवता येत नाही, हे तिने कधीकाळी म्हटलेले वाक्य पुन्हा समोर उभे राहिले.
- स्वदेश घाणेकर
दोन वर्षांपूर्वी तिने आपल्या कामगिरीने भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला दखल घेण्यास भाग पाडले. अथक परिश्रम, कणखर मानसिकता, प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पुढे चालत राहण्याचा निर्धार यामुळे ती भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनली. भारतात तिला '' जिम्नॅस्टिक्स राणी'' असे संबोधले जाऊ लागले. पण, 2016मधील यशानंतर ती अचानक नाहीशी झाली. स्वेच्छेने नव्हे तर दुखापतीमुळे तिला खेळापासून दूर व्हावे लागले. अनेक स्पर्धांमधून माघारही घ्यावी लागली. वॉकरच्या साहाय्याने चालावे लागत असल्यामुळे तिची कारकीर्द संपली अशा चर्चा रंगल्या. पण, ती इतक्या सहजासहजी हार मानणारी नव्हती. रविवारी पुन्हा एकदा तिचे नाव ऐकून आनंद झाला. धोका पत्करल्याशिवाय आयुष्यात मोठे यश मिळवता येत नाही, हे तिने कधीकाळी म्हटलेले वाक्य पुन्हा समोर उभे राहिले.
त्रिपुरा येथील आगरतळा येथील दीपा कर्माकरने 2014च्या राष्ट्रकुल व 2015 च्या आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्यपदक पटकावली. त्यावेळी भारताच्या खात्यात अमुक एक खेळाडूने पदक जमा केले, इतकाच तिचा उल्लेख. मात्र 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिने भारतीयांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला दखल घेण्यास भाग पाडले. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने प्रोडुनोव्हा सारख्या आव्हानात्मक जिम्नॅस्टिक प्रकारात सहभाग घेतला. केवळ सहभाग घेऊन ती माघारी परतली नाही, तर अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंना तिने तोडीसतोड खेळ केला. थोड्याश्या गुणांनी तिचे पदक हुकले, पण तिने शंभर कोटीहून अधिक भारतवासीयांची मनं जिंकली. तिच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर जिम्नॅस्टिक हा खेळ घराघरात पोहोचला.
पण, दुर्दैवाने आशियाई आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक्स स्पर्धेच्या तयारीदरम्यान तिचा गुडघ्याला दुखापत झाली. गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला ब-याच स्पर्धांतून माघार घ्यावी लागली होती. त्यात 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेचाही समावेश होता. वॉकरच्या साहाय्याने चालणारी दीपा पाहून ती पुनरागमन करेल ही आशाच सोडून दिली होती. पण, आव्हानांसमोर डगमगणारी दीपा नाही, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केले. दीपाने तुर्कस्थान येथे सुरु असलेल्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतील दीपाचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.
.@DipaKarmakar brings home a🥇in vault event of Women’s Artistic #Gymnastics from the FIG #World Challenge Cup in #Turkey.
— YAS Ministry (@YASMinistry) July 8, 2018
Kudos to you girl.
You are nation's proud. 🇮🇳 👏👏@IndiaSportspic.twitter.com/ve4N1IMW0n
या स्पर्धेत दीपाने प्रोडुनोव्हा या प्रकारात सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे व्हॉल्ट या प्रकारात दीपा कशी कामगिरी करते याकडे साऱ्यांचे लक्ष होते. अंतिम फेरीत दीपाने 14.150 गुण कमावत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. या सुवर्णकामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या या पुनरागमनाने पुन्हा एकदा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
This medal is for everyone who never stopped believing in me! Thank you @Media_SAI, Gymnastic Federation of India, Anant Joshi Sir, @GoSportsVoices, my physio Sajad bhai, Tripura Govt, Nandi sir and @merakiconnect for the endless support and encouragement. pic.twitter.com/FJmiusIW2A
— Dipa Karmakar (@DipaKarmakar) July 9, 2018