जेव्हा कॅरम बोर्डवर सहजपणे फिरतात ‘पाय’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 10:10 PM2019-09-26T22:10:29+5:302019-09-26T22:11:21+5:30
हात नसल्याचे दु:ख विसरुन पायाच्या जोरावर हर्षद गोठणकरने मिळवले यश
रोहित नाईक, मुंबई : ‘अरे बापरे... असं कसं होऊ शकतं.. हा मुलगा पायाने इतक्या सहजपणे कसा काय खेळतो?.. हे तर गॉड गिफ्ट टॅलेंट आहे... ’ यासारख्या अनेक प्रतिक्रिया येत होत्या नुकत्याच पार पडलेल्या एका महाविद्यालयीन कॅरम स्पर्धेमध्ये. कारण सुमारे १२० हून अधिक खेळाडूंचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत एक खेळाडू आपल्या अलौकिक खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. जन्मापासून दोन्ही हात नसलेला हर्षद गोठणकर हा युवा खेळाडू आपल्या पायाच्या साहाय्याने अगदी कसलेल्या खेळाडूप्रमाणे कॅरम बोर्डवर वर्चस्व गाजवत होता आणि या झुंजारवृत्तीनेच त्याने सर्वांची मने जिंकली.
गेल्याच आठवड्यात गोरेगाव येथील संस्कारधाम केळवणी मंडळाच्या जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या वतीने झालेल्या आंतर महाविद्यालयीन कॅरम स्पर्धेत हर्षदने आपल्या खेळाने सर्वांना वेड लावले. विविध कॅरम स्पर्धेत सहभागी होत छाप पाडलेला हर्षद जेव्हा सहजपणे आपले पाय कॅरम बोर्डवर फिरवतो, तेव्हा प्रतिस्पर्धी खेळाडूही त्याच्या खेळाने मंत्रमुग्ध होतो. विशेष म्हणजे स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारल्यानंतर हर्षदच्या खेळाची कीर्ती जेव्हा पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिश नारिंग्रेकर यांना कळाली, तेव्हा त्यांनीही त्याच्या सामन्यासाठी विशेष उपस्थिती लावताना हर्षदचा झुंजार खेळ पाहिला.
परळ येथील एमडी महाविद्यालयात एम. कॉमचा विद्यार्थी असलेला आणि कुर्ला येथील रहिवासी असलेल्या हर्षदला लहानपणापासून खेळांची आवड. दखल घेण्याची बाब म्हणजे हर्षद केवळ कॅरमच नाही, तर फुटबॉल, क्रिकेट, जलतरण अशा खेळांसह जिममध्येही जातो. परंतु, ‘१२वीला असताना मैदानी खेळ खेळताना तोल सांभाळताना अडचण आली आणि धडपडलोही. तेव्हा मित्रांनी मला बैठा खेळ खेळण्यास सांगितले आणि मी कॅरमकडे वळालो,’ असे हर्षदने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आतापर्यंतच्या या प्रवासात हर्षदला वडिल शंकर गोठणकर यांची मोलाची साथ मिळाली. वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली कॅरमचे धडे गिरवल्यानंतर हर्षदचे पाय नियमितपणे कॅरम बोर्डवर फिरु लागले. हर्षदचे वडिल रिक्षा चालक असून आई वनिता या गृहिणी आहेत. ‘आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच मी खेळाची आवड जोपासू शकलो,’ असे अभिमानाने हर्षद सांगतो. अनेक विभागीय स्तरावरील कॅरम स्पर्धेत छाप पाडलेल्या हर्षदला आता राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे वेध लागले आहेत. मात्र, शारिरीक अडचणीमुळे पुढे जाण्यात अडचण येत असल्याची खंत हर्षदने व्यक्त केली. ‘पुरेशी मदत आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसले, तरी एक दिवस नक्किच मी माझे लक्ष्य गाठण्यात यशस्वी होईल. स्वत:ला कधीही कमी समजू नका. प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते. निर्धारीत लक्ष्य गाठण्यासाठी मेहनत करा, कारण त्याला कधीच कोणता पर्याय नसतो.’ असा विश्वासही हर्षदने व्यक्त केला.