जेव्हा क्रिकेटलाही राष्ट्रकुल स्पर्धेपुढे झुकावे लागले होते...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 08:53 PM2018-04-04T20:53:43+5:302018-04-04T20:53:43+5:30
बीसीसीआयने यावेळी क्वालालंपुरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला जास्त महत्व दिले नाही आणि त्यांनी चांगला संघ कॅनडाला पाठवायचे ठरवले होते. या संघात सचिन तेंडुलकरसारखे नावाजलेले खेळाडू होते.
नवी दिल्ली : क्रिकेट हा भारतामध्ये धर्म मानला जातो. त्याच्यापुढे अन्य खेळांना जास्त भाव दिला जात नाही. पण एकदा अशीही गोष्ट घडली आहे की, जेव्हा क्रिकेटला राष्ट्रकुल स्पर्धेपुढे झुकावे लागले होते.
हा गोष्ट आहे 20 वर्षांपूर्वीची, म्हणजेच 1998 सालची. त्यावेळी राष्ट्रकुल स्पर्धा क्वालालंपुर येथे खेळवली जाणार गेली होती आणि या स्पर्धेत क्रिकेटचाही सहभाग करण्यात आला होता. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तान यांचे कॅनडामध्ये सहारा चषकाचे सामने होणार होते. बीसीसीआयने यावेळी क्वालालंपुरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला जास्त महत्व दिले नाही आणि त्यांनी चांगला संघ कॅनडाला पाठवायचे ठरवले होते. या संघात सचिन तेंडुलकरसारखे नावाजलेले खेळाडू होते. ही गोष्ट भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना समजली. त्यांनी बीसीसीआयला फटकारले आणि आपला सर्वोत्तम संघ राष्ट्रकुल स्पर्धेला पाठवण्यासाठी सांगितले. त्यावेळी बीसीसीआयला त्यांच्यापुढे नमते घ्यावे लागले होते आणि संघातील नामांकित खेळाडूंना बीसीसीआयने क्वालालंपुरला पाठवले.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली झाली नाही. त्यांना प्राथमिक फेरीचा अडथळाही पार करता आला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतून झटपट बाहेर पडल्यावर भारतीय खेळाडूंनी थेट कॅनडा गाठलं आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळले. बीसीसीआयला पाकिस्तानविरुद्धचे सामने महत्वाचे वाटत असल्यामुळे भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही, असे त्यावेळी म्हटले जात होते.