मी मित्र आहे की नाही, हे विराटनेच ठरवावे
By admin | Published: March 30, 2017 10:44 PM2017-03-30T22:44:46+5:302017-03-30T22:44:46+5:30
भारताचा कर्णधार विराट कोहली याने यू टर्न घेत अजूनही आॅस्ट्रेलिया संघातील काही खेळाडू माझे मित्र आहेत, असे सांगितले.
शिवाजी गोरे,
नवी दिल्ली, दि. 30 - आॅस्ट्रेलियन खेळाडूंसोबतची मैत्री संपली असल्याचे म्हटल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याने यू टर्न घेत अजूनही आॅस्ट्रेलिया संघातील काही खेळाडू माझे मित्र आहेत, असे सांगितले. यावर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने, आपण त्याच्या मित्रांच्या यादीत आहोत की नाही हे खुद्द विराटनेच ठरवावे,’ असे म्हटले.
आगामी आयपीएलच्या 10व्या सत्रासाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने आपल्या जर्सीचे अनावरण केले. यावेळी संघाचा नवा कर्णधार स्टिव्ह स्मिथ, भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे आणि यंदाच्या मोसमात सर्वाधिक किंमत मिळवणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स उपस्थित होते. दरम्यान, पुणे संघमालक संजीव गोयंकासह, स्मिथ व रहाणे यांनी संघाची जर्सी प्रदान करुन स्टोक्सचे संघात स्वागत केले.
नुकतीच पार पडलेली भारत - आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका अनेक वादांमुळे चांगलीच गाजली. मालिका संपल्यानंतर कोहलीने, आॅस्ट्रेलियन खेळाडूंसह मैत्री संपली असल्याचे वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर त्याने यू-टर्न घेत आॅस्ट्रेलियन संघातील काही खेळाडू अजूनही आपले मित्र असल्याचे म्हटले. याबाबत स्मिथला विचारले असता तो म्हणाला की, ‘ही मालिका रोमांचक झाली. भारताने 2-1 अशी बाजी मारली आणि आता त्यातून पुढे जाण्याची गरज आहे. मी विराटच्या मित्रांच्या यादीत आहे की नाही, हे त्याने स्वत: ठरवावे. सध्या मी आयपीएलवर लक्ष केंद्रित केले असून, पुणे संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.’
त्याचप्रमाणे पुणे संघ व्यवस्थापनाने काही दिवसांपुर्वीच महेंद्रसिंग धोनीकडून नेतृत्व काढून स्मिथकडे सोपवण्याचा निर्णय घेत क्रिकेटचाहत्यांना मोठा धक्का दिला होता. याबाबत स्मिथ म्हणाला की, ‘धोनी नेहमी सकारात्मक भूमिका ठेवून असतो. आम्ही एसएमएसद्वारे संवाद साधला असून आमच्यामध्ये कोणतीही समस्या नाही. संघाचा कर्णधार बदलला असला, तरी आमच्या मैत्रीवर कोणताही परिणाम होणार नाही.’
आयपीएलमध्ये आतापर्यंत पुणे संघाला लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. या संघात गुणवत्तेची कुठलीही कमतरता नाही. दखल घेण्याची बाब म्हणजे या संघात चार कर्णधारांचा समावेश आहे. स्मिथसह धोनी, रहाणे आणि फाफ डू प्लेसिस असे चार कर्णधार असलेल्या पुणे संघाकडून फार मोठी अपेक्षा क्रिकेटचाहत्यांना आहे. याविषयी स्मिथ म्हणाला की, ‘संघात अनेक कर्णधार असणे फायद्याचे आहे. मात्र, अनेकदा सर्वांचे मत घेतल्याने गोंधळ होतो. कर्णधार म्हणून इतरांच्या तुलनेत माझी वेगळी ओळख आहे आणि मी माझ्या निर्णयांवर ठाम राहण्याचा प्रयत्न करेल. मात्र, असे असले तरी संघातील प्रत्येकाला आपले विचार आणि मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. आमच्याकडे जगातील अव्वल चार कर्णधार असून आम्ही त्याचा निश्चित फायदा घेऊ.’
>माही आता पुण्याचा कर्णधार नाही. पण त्याच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. महत्त्वाचे म्हणजे तो संघात आहे हे आमचे भाग्य आहे. त्याचवेळी स्मिथच्या नेतृत्त्वात खेळण्यास मी सज्ज आहे. ज्या संघाविरुध्द जीव तोडून खेळलो त्याच संघाच्या कर्णधारासह खेळणे आव्हानात्मक असते. यासाठी व्यावसायिक खेळाडू म्हणून मी सज्ज आहे.
- अजिंक्य रहाणे