उत्तेजक इंजेक्शन घेताना दोन मल्लांना पकडले

By admin | Published: January 8, 2016 03:37 AM2016-01-08T03:37:26+5:302016-01-08T03:37:26+5:30

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला पहिल्याच दिवशी डोपिंगचा डाग लागला. स्थानिक चिटणीस पार्क येथील स्पर्धास्थळी सकाळी उद्घाटनाआधीच

While catching a stimulating injection, two wrestlers caught | उत्तेजक इंजेक्शन घेताना दोन मल्लांना पकडले

उत्तेजक इंजेक्शन घेताना दोन मल्लांना पकडले

Next

नागपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला पहिल्याच दिवशी डोपिंगचा डाग लागला. स्थानिक चिटणीस पार्क येथील स्पर्धास्थळी सकाळी उद्घाटनाआधीच दोन मल्लांना उत्तेजक इंजेक्शन घेताना आयोजकांनी पकडले. पण, या मल्लांची नावे गुप्त ठेवण्यात आली असून, त्यांच्यावरील पुढील कारवाईबाबत कुणीही बोलायला तयार नाही.
प्रकार घडल्यानंतर दोन्ही मल्ल घटनास्थळाहून पसार झाले. नेमके काय घडले, याबद्दल आयोजक तोंड उघडायला तयार नसल्याने या मल्लांनी उत्तेजक घेतले की इंजेक्शन सिरिंज लावण्याआधीच त्यांचे बिंग फुटले, याबद्दल उलटसुलट चर्चा आहे.
आयोजन समितीचे सदस्य डॉ. दीपक खिरवडकर यांनी या दोन्ही मल्लांना पकडल्यानंतर ही बाब पंचांच्या निदर्शनास आणून दिली. आयोजकांना विचारताच दोन्ही मल्ल युवा असल्याने त्यांच्या करियरला डाग लागू नये म्हणून नावांबद्दल गुप्तता पाळण्यात येत असल्याचे कारण दिले. चौकशीअंती दोघांवर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. मल्ल स्वत:चा स्टॅमिना व ताकद वाढविण्यासाठी उत्तेजक घेतात. यामुळे किडनी आणि यकृताच्या तक्रारी पुढे येत आहेत. अशा उत्तेजकांवर बंदी असली, तरी खोटी प्रतिष्ठा मिळविण्यासाठी अनेक मल्ल असा शॉर्टकट अवलंबत असल्याची धक्कादायक माहिती कुस्तीगीर संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली.
शॉर्टकट नको, मेहनतीने मोठे व्हा : पालकमंत्री
यश मिळविण्यासाठी कुठल्याही अनुचित गोष्टीचा वापर करून शॉर्टकट मारू नका, मेहनतीने मोठे व्हा, असा मोलाचा सल्ला राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील तमाम मल्लांना दिला.
नागपूर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि म. रा. कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने चिटणीस पार्क येथे आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर खेळाडूंशी पंचांनी पक्षपात करू नये, असे सांगून खेळाडूंनीही मेहनतीच्या बळावरच यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी काही मल्ल इंजेक्शन घेत असल्याची तक्रार आल्यानंतर आयोजनाला गालबोट लागले. हाच धागा पकडून बावनकुळे म्हणाले, ‘उत्तेजक पदार्थ घेणाऱ्या मल्लांना पकडण्यासाठी डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे. जे मल्ल दोषी आढळतील, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची शिफारस केली जाईल. राज्याला कुस्तीची उज्ज्वल परंपरा आहे. अनेक ज्येष्ठ मल्ल येथे उपस्थित आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घ्या.’ एखाद्याने केलेली चूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावणारी ठरत असल्याने आयोजनाला गालबोट लागू देऊ नका, असे मल्लांना त्यांनी आवाहन केले. या वेळी व्यासपीठावर खा. रामदास तडस, माजी खा. दत्ता मेघे, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. समीर मेघे, आ. महेश लांडगे, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, राज्य कुस्ती संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, भारतीय कुस्ती महासंघाचे (माती) महासचिव रोशनलाल, राज्य कुस्ती संघटनेचे पदाधिकारी नामदेव मोहिते, सर्जेराव शिंदे, नागनाथ देशमुख, संजय शिर्के, सुरेश पाटील, हिंदकेसरी योगेश दोडके, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, माजी आॅलिम्पिक मल्ल मारुती आडकर, राहुल आवारे, अर्जुन पुरस्कारप्राप्त मल्ल काका पवार आदींची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. प्रारंभी मिरवणुकीने क्रीडा ज्योतीसह स्टेडियममध्ये आलेल्या सर्व मल्लांना नागपूर संघातील मल्ल नीलेश राऊत आणि रामचंद्र यंगळ यांनी शपथ दिली. चिमासाहेब भोसले व्यायामशाळेतर्फे शिवकालीन प्रात्यक्षिकांचे आणि अमित शाळेच्या वतीने योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले. दोन्ही आयोजनाला प्रेक्षकांची टाळ्यांच्या गजरात साथ लाभली. चिमुकला आंतरराष्ट्रीय योगपटू वैभव वामन श्रीरामे याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील वर्षी ६० व्या महाराष्ट्र केसरीचे आयोजन पुणे जिल्ह्याला देण्याची घोषणा आयोजकांनी केली. पालकमंत्र्यांनी हौदाला भेट देत मल्लांचा परिचय करून घेतला. संचालन डॉ. मनोज साल्पेकर यांनी केले.
नुसत्याच थापा, डोपिंग चाचणीची सुविधा नाहीच!
स्पर्धा सुरू होण्याआधी मल्लांचे रॅन्डम सॅम्पल घेण्याची सोय स्पर्धास्थळी नाही. पत्रकार परिषदेत आयोजकांनी नाडा (राष्ट्रीय डोपिंग प्रयोगशाळा)ची टीम येणार असल्याचे आवर्जून सांगितले होते. नाडाची सेवा महागडी असेल, तर स्थानिक डॉक्टरांच्या मदतीनेदेखील खेळाडूंवर वचक ठेवणे शक्य आहे; पण आयोजकांनी तशी काळजीच घेतलेली दिसत नाही. जुने कुस्ती संघटक दत्ता जाधव यांनी राज्य कुस्ती संघटनेचे अध्यक्ष शरद पवार आणि महासचिव बाळासाहेब लांडगे यांच्याकडे वारंवार डोपिंग चाचणी घेण्याची मागणी केली आहे. अनेकदा अशी मागणी झाल्यानंतरही मानाच्या राज्य कुस्ती स्पर्धेत मल्लांची कधीच चाचणी झालेली नाही. केवळ वजन गट उरकण्यात येऊन स्पर्धा घेण्याची परंपरा आजही कायम आहे.
विजय, अक्षयला सुवर्ण
५७ किलो गादी विभागातील उपांत्य फेरीत लातूरच्या पंकज पवार याने धुळ्याच्या १०/१ अशी मात करुन अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या विजय पाटील याने यवतमाळच्या तानाजी दाताळचा १०/० असा दणदणीत पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. कांस्यपदकाच्या लढतीत सांगलीच्या बापू कोळेकर याने धुळेच्या आकाश परदेशीचा १०/० असा पराभव करुन तसेच पुणे शहरच्या शुभम थोरात याने अहमदनगरच्या दाताळचा ८/० असा पराभव करुन कांस्य पदक पटकाविले.
६५ किलोच्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या विशाल माने याने सोलापूरच्या मल्लिकार्जुन खोबनचा १२/२ ने तर कोल्हापूरच्या अक्षय हिरगुडे याने पिंपरी चिंचवडच्या संदेश काकडे याला चितपट करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. सुवर्ण पदकाच्या लढतीत विशाल माने याने कोल्हापूरच्याच अक्षय हिरगुडेचा ३/२ असा पराभव करुन सुवर्ण पदक पटकाविले. अक्षयला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

Web Title: While catching a stimulating injection, two wrestlers caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.