भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोण?
By admin | Published: April 17, 2015 01:14 AM2015-04-17T01:14:21+5:302015-04-17T08:57:52+5:30
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी माजी कर्णधार सौरव गांगुलीचे नाव चर्चेत आहे; पण गांगुलीने हे वृत्त फेटाळून लावले आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी माजी कर्णधार सौरव गांगुलीचे नाव चर्चेत आहे; पण गांगुलीने हे वृत्त फेटाळून लावले आहे. गांगुलीव्यतिरिक्त माजी कर्णधार राहुल द्रविडचे नावही प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, गांगुलीने भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले असून, सध्या क्रिकेट प्रशासनामध्ये भूमिका बजावण्यावर लक्ष केंद्रित केलेले असल्याचे सांगतिले. द्रविडकडून अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ विश्वकप स्पर्धेनंतर संपुष्टात आला. भारतीय संघाच्या हाय प्रोफाईल प्रशिक्षकाचा शोध सुरू आहे आणि यासाठी वेगवेगळ्या सूचना मिळत आहेत.
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले, की प्रशिक्षकपदाबाबत चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचा पुढील आंतरराष्ट्रीय कार्यक्रम जून महिन्यात असून, बोर्डाकडे प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी पुरेसा वेळ आहे.
गांगुलीने फ्लेचर यांचे स्थान घेण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार गांगुलीला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणे आवश्यक आहे; पण या माजी कर्णधाराने मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. गांगुलीबाबतच्या प्रश्नांना ठाकूर यांनीही थेट उत्तर देण्याचे टाळले. बीसीसीआयचे सचिव म्हणाले, ‘‘दालमिया व मी स्वत: अनेकांसोबत चर्चा केली; पण निर्णय बोर्डाचे सीनिअर सदस्य व संघातील खेळाडू आणि कर्णधारासोबत चर्चा केल्यानंतरच तो घेतला जाईल.’’
बीसीसीआयमधील एक गट द्रविडलाही या शर्यतीत बघण्यास उत्सुक आहे. द्रविडला भारतीय क्रिकेटमध्ये आदराचे स्थान आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक व मेंटर म्हणून द्रविडची कामगिरी उल्लेखनीय आहे. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयला प्रशिक्षकपदासाठी कसोटी संघाचा कर्णधार कोहली व वन-डे व टी-२० संघाचा कर्णधार धोनी आहे या दोघांचेही मत विचारात घ्यावे लागणार आहे. बोर्डाच्या कार्यकारी समितीची बैठक २६ एप्रिलला कोलकात्यात होणार आहे. त्यात नव्या प्रशिक्षकाच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीला या हाय प्रोफाईल पदासाठी सर्वप्रथम अर्ज मात्र करावा लागणार, हे निश्चित.