फायनलचे तिकीट कोणाला?
By admin | Published: March 24, 2015 01:02 AM2015-03-24T01:02:24+5:302015-03-24T01:02:24+5:30
उपांत्य फेरीतील पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यास उत्सुक असलेले न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान विश्वकप स्पर्धेत मंगळवारी पहिली उपांत्य लढत रंगणार आहे.
पहिली उपांत्य लढत : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका काट्याची टक्कर
आॅकलंड : उपांत्य फेरीतील पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यास उत्सुक असलेले न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान विश्वकप स्पर्धेत मंगळवारी पहिली उपांत्य लढत रंगणार आहे. उभय संघ अंतिम फेरीत स्थान मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. या निमित्ताने उभय संघांना इतिहास नोंदवण्याची संधी आहे. कारण, यापूर्वी न्यूझीलंडला कधीच अंतिम फेरी गाठता आली नाही; तर दक्षिण आफ्रिका संघ या क्रिकेट महाकुंभात कधीच फायनलसाठी पात्र ठरलेला नाही. न्यूझीलंडला यापूर्वी सहा वेळा विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला, तर दक्षिण आफ्रिका संघाला तीनदा उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे.
साखळी फेरीत एकतर्फी वर्चस्व गाजवल्यानंतर न्यूझीलंडने उपांत्यपूर्व फेरीत मार्टिन गुप्तिलच्या आक्रमक द्विशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्ध सहज विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने २०१५ च्या विश्वकप स्पर्धेत सलग सात सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडतर्फे प्रत्येक लढतीत एक नवा खेळाडू ‘हिरो’ म्हणून पुढे आला आहे. गेल्या लढतीत ही भूमिका मार्टिन गुप्तिलने साकारली. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद २३७ धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या फलंदाजांना प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजावर वर्चस्व गाजवण्यात विशेष अडचण आली नाही. पण दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध
मात्र त्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिका संघात डेल स्टेन व मोर्ने मोर्कल यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे. स्टेन व मोर्कल फॉर्मात असतील तर ते जगातील कुठल्याही संघाविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहेत.
दरम्यान, न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक माईक हेसन म्हणाले, ‘भूतकाळातील अपयशाला अधिक महत्त्व नसते, कारण दोन्ही संघ या स्पर्धेत शानदार कामगिरी करीत आहेत. आम्ही अंतिम फेरीत स्थान मिळविण्यास उत्सुक असून मंगळवारची लढत रंगतदार होईल. उभय संघ चांगला खेळ करीत असून उपांत्य लढतीत चुरस अनुभवाला मिळेल.’
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने याला टाचेच्या दुखापतीमुळे उपांत्य लढतीतून माघार घ्यावी लागली. मिल्नेची दुखापत न्यूझीलंड संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्याच्या स्थानी युवा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीचा समावेश करण्यात आलेला आहे.
या विश्वकप स्पर्धेत न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली होणारी ही अखेरची लढत आहे. प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका संघही तुल्यबळ असून अन्य संघांच्या तुलनेत अधिक धोकादायक आहे. न्यूझीलंड संघावर मायदेशात खेळताना चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे राहणार आहे, पण कर्णधार ब्रेन्डन मॅक्युलम मात्र याबाबत अधिक विचार करीत नाही. न्यूझीलंड संघाला कधीच प्रबळ दावेदार मानले गेलेले नाही, तर दक्षिण आफ्रिका संघ ‘चोकर्स’च्या शिक्क्यासह खेळत आहे. दक्षिण आफ्रिका संघाला उपांत्य लढतीत विजय मिळविण्यात अपयश आले तर त्यांच्यावरील चोकर्सचा शिक्का कायम राहणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघाला फॉर्मात असलेला कर्णधार एबी डिव्हिलियर्सकडून अधिक अपेक्षा आहेत. आघाडीच्या फळीची भिस्त हाशिम आमला व सूर गवसलेल्या क्विंटन डी कॉकच्या कामगिरीवर अवलंबून आहे. फाफ ड्यू प्लेसिसला या स्पर्धेत अद्याप छाप सोडता आलेली नसून त्याच्याकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. पहिल्या उपांत्य लढतीतील विजेत्याबाबत भाकित वर्तवणे कठीण आहे. उभय संघांत दर्जेदार फलंदाज व अचूक मारा करण्याची क्षमता असलेल्या गोलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे लढत रंगतदार होण्याची आशा आहे. (वृत्तसंस्था)
दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला, केली एबोट, फरहान बेहार्डीन, क्विंटन डी कॉक, जीन पॉल ड्युमिनी, फाफ ड्यू प्लेसिस, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, मोर्ने मोर्कल, व्हेन पार्नेल, अॅरोन
फांगिसो, वर्नन फिलँडर, रिली रोसेयू आणि डेल स्टेन.
न्यूझीलंड : ब्रेन्डन मॅक्युलम (कर्णधार), कोरी अॅण्डरसन, ट्रेन्ट बोल्ट, ग्रॅन्ट इलियट, मार्टिन गुप्तिल, टॉम लॅथम, मिशेल मॅक्लेघन, नॅथन मॅक्युलम, केली मिल्स, ल्युक रोंची, टीम साऊदी, रॉस टेलर, डॅनियल व्हेटोरी, केन विलियम्सन आणि मॅट हेन्री.