रणजी चषक कुणाचा?
By admin | Published: January 10, 2017 01:56 AM2017-01-10T01:56:06+5:302017-01-10T01:56:06+5:30
रणजी ट्रॉफी स्पर्धेत पहिले जेतेपद पटकाविण्यास उत्सुक असलेल्या गुजरात संघाला आज, मंगळवारपासून प्रारंभ होणाऱ्या अंतिम लढतीत ४१
इंदूर : रणजी ट्रॉफी स्पर्धेत पहिले जेतेपद पटकाविण्यास उत्सुक असलेल्या गुजरात संघाला आज, मंगळवारपासून प्रारंभ होणाऱ्या अंतिम लढतीत ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या मुंबई संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
उपांत्य फेरीत विजय मिळविल्यामुळे मुंबई व गुजरात संघांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. उपांत्य फेरीत मुंबईने तमिळनाडूचा, तर गुजरातने झारखंडचा पराभव केला.
मुंबईला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे, तर ६६ वर्षांनंतर अंतिम फेरीत स्थान मिळविणाऱ्या गुजरात संघाला पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुजरात संघाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. गुजरात संघाने गेल्या मोसमात विजय हजारे करंडक पटकाविला होता, तर २०१२-१३मध्ये सैयद मुश्ताक अली चषक पटकाविला होता.
गुजरात संघ कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरला, तर त्यांना गत चॅम्पियन मुंबईला पुन्हा एक जेतेपद पटकाविण्यापासून रोखण्याची चांगली संधी आहे. पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाला या लढतीत आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविना उतरावे लागेल. बुमराह सध्या राष्ट्रीय संघासोबत व्यस्त आहे. बुमराह व्यतिरिक्त अनुभवी आर. पी. सिंगने उपांत्य फेरीत झारखंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. बुमराहने दुसऱ्या डावात कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना २९ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले होते. त्यामुळे पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतरही गुजरात संघाने १२३ धावांनी विजय मिळविला होता. बुमराहच्या अनुपस्थितीत मेहुल पटेल, आर. पी. सिंग आणि रुष कलारिया वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतात.
फलंदाजीमध्ये गुजरातचा सलामीवीर व स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकाविणारा प्रियांक पांचाल याच्याकडून आणखी एका चमकदार खेळीची अपेक्षा आहे. पांचालने आतापर्यंत ९७.६९ च्या सरासरीने १२७० धावा फटकावल्या आहेत. त्याचा सलामीचा सहकारी समित गोहेलही चांगल्या फॉर्मात आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता मुंबईला यंदाच्या मोसमात खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघर्ष करावा लागला आहे; पण बेंच स्ट्रेंथ मजबूत असल्यामुळे त्यांना अनुकूल निकाल मिळविता आले. उपांत्य फेरीत युवा पृथ्वी शॉ याला संधी देणे मुंबईसाठी फायद्याचे ठरले होते. त्याने पदार्पणात शतक झळकाविले, शिवाय त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईने पाचव्या व अखेरच्या दिवशी २५१ धावांचे लक्ष्य गाठण्यात यश मिळविले होते.
यंदाच्या मोसमात मुंबईची फलंदाजीची भिस्त श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव व कर्णधार आदित्य तारे यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. संघाचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज फिरकीपटू विजय गोहिलने २७ बळी घेतले आहेत. (वृत्तसंस्था)
मुंबईचे पारडे जड : दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईचे पारडे नक्कीच जड दिसून येईल. मुंबई - गुजरात यांच्यात आतापर्यंत एकूण ६१ सामने झाले असून, यामध्ये मुंबईकर केवळ दोन वेळा पराभूत झाले आहेत. त्यातही १९७७-७८ साली मुंबईचा गुजरातविरुद्ध अखेरचा पराभव झाला होता. त्यामुळे गुजरातसमोर तगडे आव्हान आहे.
अखेरचा फायनल पराभव १९९०-९१ मध्ये
रणजी स्पर्धेतील अंतिम सामन्याची आकडेवारी मुंबईसाठी मजबूत आहे. मुंबईने स्पर्धेच्या तब्बल ४५ अंतिम सामन्यांपैकी ४१ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, याआधी १९९०-९१ साली मुंबईचा अंतिम सामन्यात हरियाणाविरुद्ध अखेरचा पराभव झाला आहे. यानंतर एकूण ९ वेळा अंतिम फेरी गाठताना मुंबईने प्रत्येकवेळी बाजी मारली आहे. गुजरातने १९५०-५१ सालानंतर पहिल्यांदाच रणजी अंतिम फेरी गाठली आहे.
प्रतिस्पर्धी संघ :
मुंबई : आदित्य तरे (कर्णधार), अखिल हेरवाडकर, पृथ्वी शॉ, श्रेयश अय्यर, सूर्यकुमार यादव, अभिषेक नायर, सिद्धेश लाड, तुषार देशपांडे, अक्षय गिरप, विजय गोहिल, शार्दुल ठाकूर आणि बलविंदर संधू
गुजरात : पार्थिव पटेल (कर्णधार), समित गोहेल, प्रियांक पांचाळ, भर्गव मेराई, मनप्रित जुनेजा, रुजुल भट, चिराग गांधी, रुश कलारिया, आरपी सिंग, मेहुल पटेल, चिंतन गाजा आणि हार्दिक पटेल.
आम्ही खेळाचा आनंद घेऊ : पार्थिव
आमचा संघ अंतिम सामन्यात कोणत्याही दबावाखाली उतरणार नसून आम्ही खेळाचा पूर्ण आनंद घेऊ, अशी प्रतिक्रिया गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल याने रणजी अंतिम सामन्याआधी दिली. पहिलेवहिले रणजी विजेतेपद पटकाविण्यासाठी गुजरातपुढे तब्बल ४१वेळा विजेते ठरलेल्या मुंबईचे तगडे आव्हान आहे. येथील होळकर स्टेडियमवर झालेल्या सराव सत्रानंतर पार्थिवने म्हटले की, ‘यंदाच्या मोसमात केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर आम्ही अंतिम फेरी गाठली. एक सामान्य सामन्यासह याकडे पाहताना कोणताही दबाव न घेता खेळण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’ गुजरातच्या संघाने ६६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, ‘अंतिम सामन्याआधी आमचा संघ पूर्ण फॉर्ममध्ये असून, आमची स्थिती मजबूत आहे. आम्हाला आता तटस्थ मैदानांवर खेळण्याची सवय पडली असून, आम्ही नक्कीच यशस्वी कामगिरी करू,’ असे मुंबईचा कर्णधार आदित्य तरे याने सांगितले.