टी-२० चा बादशहा कोण?

By Admin | Published: April 3, 2016 03:52 AM2016-04-03T03:52:42+5:302016-04-03T03:52:42+5:30

महिनाभर गाजलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज रविवारी ऐतिहासिक ईडन गार्डनवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. जगातील सर्वोत्तम

Who is the T20 champion? | टी-२० चा बादशहा कोण?

टी-२० चा बादशहा कोण?

googlenewsNext

कोलकाता : महिनाभर गाजलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज रविवारी ऐतिहासिक ईडन गार्डनवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. जगातील सर्वोत्तम संघांना नमवून अंतिम फेरीत दाखल झालेले हे दोन्ही संघ विश्व चॅम्पियन बनण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्यास सज्ज झाले आहेत.
जबर फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडने पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला सात गड्यांनी धूळ चारली. वेस्ट इंडिजने दुसऱ्या उपांत्य सामन्यात जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला सात गड्यांनी पराभूत केले.
भारताविरुद्ध लकी ठरलेल्या लेंडल सिमन्सकडून विंडीजला अंतिम सामन्यातही कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल.
विंडीज तसेच इंग्लंडला सुरुवातीला जेतेपदाच्या शर्यतीत कुणीही मोजले नव्हते. पण भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगला देश यापैकी कुणीही फायनलमध्ये पोहोचू शकले नाहीत. जेतेपदाच्या शर्यतीत सध्या विंडीजचे पारडे जड मानले जाते पण सत्य असे की उभय संघात ‘काट्याची टक्कर’ होईल. इंग्लंड गंभीरपणे खेळत असल्याने कॅरेबियन संघाला सावध रहावे लागेल.
इंग्लंडने झटपट प्रकारात गेल्या वर्षभरात फारच सुधारणा घडवून आणली. विंडीजविरुद्ध पहिल्या पराभवानंतर त्यांचे डोळे उघडले. या संघाची धुरा ज्यो रुड आणि जेसन रॉय यांच्यासह कर्णधार मोर्गन यांच्यावर असेल. विंडीजच्या दिग्गज फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन आणि बेन स्टोक्स यांच्याकडे राहील. (वृत्तसंस्था)

बलाबल...
२०१० चा चॅम्पियन इंग्लंड आणि २०१२ चा चॅम्पियन वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ एकाच गटातून अंतिम फेरीत दाखल झाले हे विशेष. याआधी उभय संघात झालेल्या साखळी लढतीत कॅरेबियन संघाने बाजी मारली होती. फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार डेरेन सॅमीच्या विंडीज संघाला विजयाची पुनरावृत्ती करायचीय तर इंग्लंड बाजी उलटविण्यास आतूर आहे. इंग्लंडने संयमी खेळ करीत शांतपणे मोहीम पुढे राबविली हे देखील विशेष.
२०१० मध्ये विंडीजच्या यजमानपदाखाली झालेल्या विश्वचषकात इंग्लंडने आॅस्ट्रेलियाचा सात गड्यांनंी पराभव करीत चषक जिंकला.विंडीजने २०१२ मध्ये लंकेच्या यजमानपदाखाली यजमान संघाला ३६ धावांनी पराभूत करीत चषक जिंकला होता. त्या संघाचा खेळाडू राहिलेल्या सॅमीकडे यंदा विंडीज संघाचे नेतृत्व आहे. या संघात ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, सॅम्युअल बद्री,आंद्रे रसेल आणि जॉन्सन चार्ल्स हे मॅचविनर आहेत.

मॅचविनर्स...
वेस्ट इंडिज : लेंडल सिमन्स, आंद्रे रसेल, जॉन्सन चार्ल्स, डेरेन सॅमी, ड्वेन ब्राव्हो, सॅम्युअल बद्री.
इंग्लंड: ज्यो रुट, जेसन रॉय, जोस बटलर, कर्णधार इयोन मोर्गन, अ‍ॅलेक्स हेल्स.

बेभरवशाचा गेल...
ख्रिस गेलने सलामीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध १०० धावा केल्या पण त्यानंतर तो दहा धावा काढण्यातही अनेकदा अपयशी ठरला आहे. तो एकट्याच्या बळावर सामना जिंकून देऊ शकतो पण कधी पहिल्या चेंडूवरही बाद होऊन जातो. चौकार, षटकारांचा हा बादशाह आतापर्यंत केवळ ११ षटकार व सात चौकार मारण्यात यशस्वी ठरला आहे.

खेळाडू काळी फित लावणार
कोलकाता: टी-२० विश्वचषकाच्या महिला आणि पुरुषांच्या अंतिम सामन्यात सर्व खेळाडू आज रविवारी ईडन गार्डनवर काळी फित लावून खेळणार आहेत. भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याने ही माहिती दिली. उड्डाणपूल कोसळल्याने मृत्युमुखी पडलेल्यांप्रती श्रद्धांजली म्हणून खेळाडू दंडावर काळ्या फिती लावतील. गुरुवारी झालेल्या या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला तर शंभरावर लोक जखमी झाले होते.

संघ यातून निवडणार
वेस्ट इंडिज : डेरेन सॅमी (कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, ख्रिस गेल, मर्लोन सॅम्युअल्स, लेंडल सिमन्स, आंद्रे रसेल, दिनेश रामदीन, ड्वेन ब्राव्हो, कार्लोस ब्रेथवेट, सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, जेसन होल्डर, जेरोम टेलर, एविन लुईस आणि अ‍ॅश्ले नर्स.
इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), जेसन राय, जेम्स विन्स, अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रुट, मोईन अली, जोस बटलर, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स, डेव्हिड विली, लियॉम प्लंकेट, रीसी टोप्ले, ख्रिस जॉर्डन, आदील राशिद आणि लियॉम डॉसन.

सामन्याची वेळ सायं. ७.०० पासून. स्थळ : ईडन गार्डन, कोलकाता

Web Title: Who is the T20 champion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.