धमकी कोणाला?
By admin | Published: September 27, 2015 12:13 AM2015-09-27T00:13:30+5:302015-09-27T00:13:30+5:30
भारताने डिसेंबर महिन्यात पाकविरुद्ध मालिका न खेळल्यास भविष्यात टीम इंडियासोबत खेळणार नसल्याची धमकी पाक क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांनी दिली.
लखनौ : भारताने डिसेंबर महिन्यात पाकविरुद्ध मालिका न खेळल्यास भविष्यात टीम इंडियासोबत खेळणार नसल्याची धमकी पाक क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांनी दिली. यावर प्रतिक्रिया देताना आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी, शेजारी देशाशी क्रिकेट खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले आहे. शहरयार यांची धमकी बीसीसीआयसाठी आहे की आयसीसीसाठी हेच समजण्यापलीकडचे असल्याचे शुक्ला म्हणाले.
एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘‘शहरयार यांना नियम माहिती नसावेत. पीसीबीला आयसीसीचे नियम बंधनकारक आहेत. बहिष्काराची धमकी असेल तर आयसीसी त्यांच्यावर दंड आकारेल. सुरक्षेच्या मुद्द्यावरून इंग्लंड किंवा आॅस्ट्रेलिया तर दूरच बांगलादेशदेखील पाक दौऱ्यावर यायला तयार नाही. पीसीबी सामन्याची आणि खेळाडूंच्या सुरक्षेची हमी घेऊ शकते का? पाकसोबत मालिकेची तयारी
केली तरी आम्ही सरकारकडे मंजुरीसाठी जाऊ. तेथे अनेक कारणास्तव अडथळे येतील. अशा वेळी डिसेंबरमध्ये मालिकेचे आयोजन शक्य नाही.’’
बीसीसीआय प्रमुख सर्वानुमते व्हावा
बीसीसीआयचा नवा प्रमुख सर्वानुमते व्हावा अशी सूचना करीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे शुक्ला यांनी सांगितले. सर्वानुमते नवा अध्यक्ष होणे हीच दालमियांना खरी श्रद्धांजली असेल, असेही ते म्हणाले.
सचिनपेक्षा सेहवाग सरस
शुक्ला यांच्यासोबत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर उपस्थित होते. शुक्ला म्हणाले, ‘‘अनेक बाबतीत सेहवाग सचिनपेक्षा सरस आहे.’’
बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली याची नियुक्ती झाल्याबद्दल दोन्ही खेळाडूंनी आनंद व्यक्त केला. संघटनेच्या प्रमुखपदी खेळाडू आल्यास परिस्थितीची जाणीव होण्यास मदत मिळत असल्याचे मत दोघांनी व्यक्त केले.
-----
सेहवाग, गंभीर राजकारणात
येण्यास इच्छुक
सेहवाग आणि गंभीर हे राजकारणात प्रवेशास इच्छुक दिसले. शुक्ला यांनी राजकारण प्रवेश करण्याचा दोघांनाही प्रस्ताव देताच सेहवाग म्हणाला, की भविष्यात तुमच्या प्रस्तावावर विचार करेन. सचिनला राज्यसभेत घेतले मलादेखील राज्यसभेवर
घ्या, अशी टिप्पणी वीरूने नोंदविली. गंभीरचे मत मात्र
वेगळे होते. तो म्हणाला, ‘‘राज्यसभेपेक्षा मी लोकसभेची निवडणूक लढविण्यास प्राधान्य देईल. जनता आम्हाला लोकसभेत बसताना पाहू इच्छिते का, याचा वेध घेता येईल.’’
-----------
शहरयार यांना नियम माहिती नसावेत. पीसीबीला आयसीसीचे नियम बंधनकारक आहेत. बहिष्काराची धमकी असेल तर आयसीसी त्यांच्यावर दंड आकारेल. सुरक्षेच्या मुद्द्यावरून इंग्लंड किंवा आॅस्ट्रेलिया तर दूरच बांगलादेशदेखील पाक दौऱ्यावर यायला तयार नाही.
- राजीव शुक्ला(वृत्तसंस्था)