कोण होणार कोपा किंंग?
By admin | Published: June 26, 2016 02:00 AM2016-06-26T02:00:44+5:302016-06-26T02:00:44+5:30
अमेरिका खंडाचा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना विद्यमान चॅम्पियन चिली आणि अर्जेटिना यांच्यात होत असून स्टार फुटबॉलर
आज फायनल : मेस्सीवर अर्जेंटिनाचा भरवसा
न्यूयॉर्क : अमेरिका खंडाचा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना विद्यमान चॅम्पियन चिली आणि अर्जेटिना यांच्यात होत असून स्टार फुटबॉलर लियोनल मेस्सीच्या जोरावर चिलीकडून विजेतेपदाचा मुकुट हिसकावून घेण्यास अर्जेंटिना सज्ज झाला आहे.
पाच वेळेचा वर्ल्ड फुटबॉलर आॅफ द इयर मेस्सीने आपल्या कारकिर्दीत पेले आणि माराडोना यांच्या तुलनेत सर्व काही मिळवले असले तरी तो आपल्या मायदेशाला कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देऊ शकलेला नाही.
ईस्ट रुदरफोर्डच्या मेटलाईफ स्टेडीयममध्ये ८१ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत अर्जेटिनाचा संघ चिलीला हरवून २३ वर्षांचा आपला विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्न करेल. मेस्सी सेनेची गेल्या तीन वर्षातील मोठ्या स्पर्धेची ही तिसरी फायनल आहे.
मेस्सी या स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असून त्याने पाच गोल केले आहेत. यात पॅराग्वेविरुध्दच्या त्याच्या शानदार हॅटट्रीकचा समावेश आहे. याच स्पर्धेत त्याने ५५ व्या गोलची नोंद करुन अर्जेटिनाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. अंतिम सामन्यातही मेस्सीकडून देशवासियांना अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
अर्जेंटीनाला २0१४ मध्ये विश्वचषकात जर्मनीकडून 0-१ गोलने पराभूत व्हावे लागले होते. गेतवर्षी कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिलीकडून पेनाल्टी शूटआऊटमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. (वृत्तसंस्था)
आमच्या संघाने रविवारी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवला पाहिजे अन्यथा त्यांनी परत येवू नये.
- दिएगो माराडोना, माजी कर्णधार अर्जेटिना
जे कोणताही विचार न करता टीका करतात त्यांची मला कीव येते. आम्ही दोनदा उपविजेतेपद मिळवले आहे, हेही कमी नाही.
- लियोनल मेस्सी, स्टार फुटबॉलर अर्जेटिना