दिवाळी कोणाची, दिवाळं कोणाचं ?

By admin | Published: October 29, 2016 03:29 AM2016-10-29T03:29:37+5:302016-10-29T03:29:37+5:30

कामगिरीत सातत्याचा अभाव असलेला भारतीय संघ आज, शनिवारी पाचव्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजयाच्या निर्धाराने

Whose day is Diwali, who is Diwali? | दिवाळी कोणाची, दिवाळं कोणाचं ?

दिवाळी कोणाची, दिवाळं कोणाचं ?

Next

विशाखापट्टणम् : कामगिरीत सातत्याचा अभाव असलेला भारतीय संघ आज, शनिवारी पाचव्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे. या सामन्यात धोनीच्या नेतृत्वकौशल्याची कसोटी पणाला लागेलच, शिवाय ‘फिनिशर’च्या भूमिकेची परीक्षा ठरेल. मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली असल्याने शेवटचा सामना जिंकून दिवाळी कोण साजरी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
न्यूझीलंडला पहिल्यांदा द्विपक्षीय मालिका जिंकून इतिहास घडविण्याची संधी असेल. सामन्यावर वादळ आणि पावसाचे संकट कायम आहे. धोनीच्या नेतृत्वावर सध्यातरी संकट नसले तरी न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावल्यास क्षमतेवर प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारताने धोनीच्या नेतृत्वात गेल्या काही महिन्यांत तीन एकदिवसीय मालिका गमावल्या. भारताचा बांगला देशकडून १-२ ने, आॅस्ट्रेलियाकडून १-४ ने आणि द. आफ्रिकेकडून २-३ ने पराभव झाला होता. १८ महिन्यांत केवळ झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकता आली होती.
न्यूझीलंडने या मालिकेत धर्मशाळा येथे पहिला सामना गमावल्यानंतर दिल्लीत कर्णधार केन विलियम्सन आणि रांचीत मार्टिन गुप्तिलच्या धडाकेबाज खेळीद्वारे विजय नोंदवीत मालिकेत चुरस निर्माण केली. विराटवर भारतीय संघ या मालिकेत विसंबून असलेला जाणवला. दुसरीकडे रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेच्या सलामी जोडीने आतापर्यंत निराशच केले. रांची येथे रहाणेने अर्धशतक ठोकले, पण विराट बाद होताच मधली फळी कोसळली.
गोलंदाजीत अमित मिश्रा, अक्षर पटेल आणि केदार जाधव यांच्या फिरकी त्रिकुटाने चांगली कामगिरी केल्यामुळे अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची उणीव जाणवली नाही. वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह हा लवकर फिट व्हावा, असे संघ व्यवस्थापनाला वाटत असावे; कारण रांचीत त्याचे स्थान घेणाऱ्या धवल कुलकर्णी याने चक्क निराश केले होते.
न्यूझीलंडला गुप्तिल फॉर्ममध्ये परतल्याचा लाभ झाला. टॉम लेथमसोबत तो चांगली सुरुवात करून देत आहे. तिसऱ्या स्थानावर विलियम्सनने कर्णधाराला साजेशी कामगिरी केली. पाऊस आणि वादळ हे अस्मानी संकट कायम असले तरी भारताने सामना जिंकून दिवाळीची भेट द्यावी, अशी तमाम भारतीयांची इच्छा असेल. न्यूझीलंडदेखील ऐतिहासिक मालिका विजयासह परत जाण्याच्या इराद्यासह उतरणार आहे. (वृत्तसंस्था)

लक्षवेधी...
1988
पासून भारतात झालेल्या चारही द्विपक्षीय मालिकेत न्यूझीलंड संघ पराभूत झाला आहे.

हवामानाची साथ लाभल्यास टीम इंडिया वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर विजयाची नोंद करण्यास उत्सुक असेल. या मैदानावर टीम इंडियाने चार सामने जिंकले तर एक सामना गमावला.

भारताने नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका क्लीनस्वीपसह ५-० ने जिंकली होती. धोनी कारकीर्दीत अखेरच्या टप्प्यात मालिका गमावण्याचा धोका पत्करणार नाही, हे तितकेच खरे.

विराट कोहलीसाठी हे मैदान लकी मानले जाते. धोनीनेदेखील याच मैदानावर पाकविरुद्ध १२३ चेंडूत १४८ धावा ठोकल्या होत्या.

उभय संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, अमित मिश्रा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मनदीपसिंग.
न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्तिल, टॉम लेथम, रॉस टेलर, कोरी अ‍ॅन्डरसन ल्यूक रोंची, जिमी नीशाम, मिशेल सेंटनर, टिम साऊदी, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, ईश सोढी, अँटन डेव्हसिच, बीजे वॉटलिंग, डग ब्रेसवेल.

सामन्याची वेळ :
दुपारी १.३० पासून

Web Title: Whose day is Diwali, who is Diwali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.