कोणाच्या पारड्यात विजय?
By admin | Published: April 17, 2015 11:58 PM2015-04-17T23:58:52+5:302015-04-17T23:58:52+5:30
जय-पराजयाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला शनिवारी उपविजेत्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळण्याची आशा आहे.
पुणे : जय-पराजयाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला शनिवारी उपविजेत्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळण्याची आशा आहे. आयपीएलमध्ये उभय संघांची वाटचाल काहीशी संथ झाल्यामुळे उभयतांना विजयाची आशा आहे.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरने मुंबई इंडियन्सवर सलामीला विजय नोंदविल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून तीन गड्यांनी पराभवाचा धक्का बसला. या दोन्ही सामन्यांत केकेआरची फलंदाजी चांगलीच झाली. त्यांनी १७० वर धावा खेचल्या. दोन्ही लढतींत अर्धशतके ठोकणारा गंभीर फॉर्ममध्ये आहे. याशिवाय मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेल यांनीही धावा काढल्या. गोलंदाजी मात्र या संघाच्या चिंतेचा विषय आहे. मोर्नी मोर्केल, सुनील नरेन, युसूफ पठाण, शाकिब अल हसन आणि पीयूष चावला यांना हवे तसे यश आलेले नाही. नरेनने सुरेख मारा केला; पण गडी बाद करण्यात त्याला अपयश आले.
दुसरीकडे पंजाबची सुरुवातही अडखळत झाली. या संघाने दोन सामने गमावले, तर एक विजय नोंदविला. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांना पराभूत केल्यानंतर मुंबई इंडियन्सला नमवून त्यांनी विजयी वाट धरली होती. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पुढच्याच सामन्यात पाच गड्यांनी पराभव पत्करावा लागला.
मुरली विजय, वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, ग्लेन मॅक्सवेल, कर्णधार जॉर्ज बेली यांच्या उपस्थितीत पंजाबची फलंदाजी भक्कम तर आहे; पण सांघिक खेळी करण्यात त्यांना अपयश आले. मॅक्सवेल मुळीच फॉर्ममध्ये नसल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली. त्याने तीन सामन्यांत केवळ १५ धावा केल्या आहेत. गोलंदाजही गडी बाद करण्यात अपयशी ठरले. मिशेल जॉन्सन, संदीप शर्मा, अनुरित सिंग आणि रिषी धवन यांनी मोठ्या धावा मोजल्या आहेत.
(क्रीडा प्रतिनिधी)
किंग्स इलेव्हन पंजाब : जॉर्ज बेली (कर्णधार),अक्षर पटेल, अनुरित सिंग, बुरान हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, गुरकीरतसिंग मान, कर्णवीर सिंग, मनन व्होरा, मिशेल जॉन्सन, परविंदर अवाना, रिषि धवन, संदीप शर्मा, शार्दूल ठाकूर, शॉन मार्श, शिवम शर्मा, तिसारा परेरा, वीरेंद्र सहवाग, रिद्धिमान साहा, मुरली विजय, निखिल नाईक, योगेश गोळवलकर.
कोलकाता नाईट राइडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, पीयूष चावला, सुनील नारायण, उमेश यादव, मोर्नी मोर्कल, रेयॉन टेन डोएशे, अजहर महमूद, योहान बोथा, पॅट कमिन्स, ब्रॉड हॉग, केसी करिअप्पा, आदित्य गढवाल, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, सुमित नरवाल, वीरप्रताप सिंग आणि वैभव रावल.