मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफर; कारणही सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 06:39 PM2024-08-11T18:39:31+5:302024-08-11T18:41:31+5:30
Sarabjot Singh and Manu Bhaker : मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली. या दोघांनाही हरियाणा सरकारनं नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र दोघांनीही ही सरकारी नोकरी करण्यास नकार दिला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये (Paris Olympics 2024) भारताला नेमबाजीच्या स्पर्धेत तीन पदकं मिळाली. भारताची महिला नेमबाज मनू भाकरनं ऐतिहासिक कामगिरी करत दोन कांस्य पदकांवर निशाणा साधला. तर १० मीटर एअर पिस्तूल मिश्र क्रीडाप्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत सरबज्योत सिंग-मनू भाकर जोडीनं कांस्य पदक पटकावलं.
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली. या दोघांनाही हरियाणा सरकारनं नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र दोघांनीही ही सरकारी नोकरी करण्यास नकार दिला आहे. तसंच, सरबज्योत सिंग आणि मनू भाकरनं नोकरीची ऑफर न स्वीकारण्याचं कारणही सांगितलं आहे.
याबाबत हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे मीडिया समन्वयक मुकेश वशिष्ठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरबज्योत सिंग आणि मनू भाकरला नोकरी जॉईन करणं, कठीण आहे. हे दोघेही पदकासाठी खेळत आहेत, असं मुकेश वशिष्ठ म्हणाले. सरबज्योत सिंग आणि मनू भाकर यांचं म्हणणं आहे की, ते नोकरीसाठी नव्हे, तर सुवर्ण पदकांसाठी खेळत आहे. दरम्यान, मनू भाकर आणि सबरज्योत सिंग यांना क्रीडा विभागात उपसंचालकपदाची ऑफर देण्यात आली होती.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयानं ३० लाख रूपयांचे बक्षीस दिलं आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची आज भेट घेतली. यानंतर मनू भाकरनं सोशल मीडियावर ट्विट करत आभार मानले आहेत. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल खूप आभार. त्यांच्या अविरत प्रयत्नांनी देशाचे खेळाडू आणखी उंच शिखरावर पोहोचतील अशी मला खात्री आहे, असं मनू भाकरनं ट्विटद्वारे म्हटलं आहे.
It was an honour to meet the Hon'ble Minister of Youth Affairs and Sports, Dr. Mansukh Mandaviya today and personally thank him for his support and encouragement. With his continued efforts, the nation's sportspersons can reach even greater heights! 🇮🇳🙏#Cheer4Bharat#Paris2024… https://t.co/1cC3w4w4T0pic.twitter.com/uR29jCGlZp
— Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) August 8, 2024
भारताला एकूण ६ पदकं
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतानं एकूण ६ पदकं जिंकली आहेत. यामध्ये ५ कांस्य आणि १ रौप्य पदक आहे. नीरज चोप्रानं भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकलं. तर भारतीय हॉकी संघानं कांस्यपदक जिंकलं आहे. नेमबाजीत देशाला तीन पदकं मिळाली आहेत. ही तिन्ही कांस्य पदकं आहेत. कुस्तीतूनही पदक मिळालं आहे. अमन सेहरावतनं कुस्तीत कांस्य पदक जिंकलं आहे.