केवळ कुस्तीपटू विनेशलाच सूट का? तिच्यात काय ‘खास’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 05:35 AM2023-07-20T05:35:54+5:302023-07-20T05:36:38+5:30

विश्वविजेती मल्ल अंतिम पंघालचा आक्षेप

Why only the wrestler Vinesh is exempt? What's special about her! | केवळ कुस्तीपटू विनेशलाच सूट का? तिच्यात काय ‘खास’!

केवळ कुस्तीपटू विनेशलाच सूट का? तिच्यात काय ‘खास’!

googlenewsNext

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकविजेता बजरंग पुनिया आणि विश्व विजेती विनेश फोगाट यांना आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत चाचणीशिवाय थेट प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय कुस्ती फेडरेशनच्या हंगामी समितीने घेतला. राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षकांच्या संमतीशिवाय हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्याची २० वर्षांखालील विश्वविजेती अंतिम पंघाल हिने ‘केवळ विनेशला सूट का?’ असा प्रश्न उपस्थित केला. 

‘केवळ मी नव्हे तर अन्य महिला मल्ल ५३ किलो गटात विनेशला हरवू शकते, असा दावा करीत अनेक महिने सरावापासून दूर असताना विनेशला सूट देण्यामागे तिच्यात असे काय विशेष आहे,’ अशी विचारणा  हिसार येथे वास्तव्यास असलेल्या १९ वर्षांच्या अंतिमने केली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) जाहीर केलेल्या पत्रकात पुरुष फ्रीस्टाइल ६५ किलो आणि महिला ५३ किलो या गटात अगोदरच कुस्तीपटूंची निवड केली आहे.  

आयओएच्या पत्रकात बजरंग आणि विनेश यांच्या नावांचा उल्लेख नसला तरी या दोघांना चाचणीतून वगळण्यात आल्याचे हंगामी समितीतील सदस्य अशोक गर्ग यांनी सांगितले. हांगझाऊ येथे २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी कुस्तीचा संघ निवडण्याकरिता निवड चाचणी घेण्याचा निर्णय भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने चार दिवसांपूर्वीच घेतला होता. ही निवड चाचणी २२ आणि २३ जुलै रोजी दिल्लीत 
होणार आहे. 

‘गेले वर्षभर सराव न करणाऱ्या विनेशला आशियाई स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल. वर्षभरात तिची कुठलीही मोठी कामगिरी नाही. दुसरीकडे मी मागच्या वर्षी ज्युनिअर विश्वचषकात सुवर्ण विजेती पहिली भारतीय महिला ठरली होते. त्यानंतर यंदा आशियाई अजिंक्यपद रौप्य जिंकले. विनेश तर जखमी आहे. साक्षी मलिक  ऑलिम्पिक पदक विजेती असूनही तिला नव्हे, तर विनेशला सूट दिली जात आहे. अखेर तिच्यात असे काय ‘खास’ आहे? आमच्यापैकी अनेक जणी विनेशला हरवू शकतात. कुस्ती महासंघानुसार आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाणारे पुढे विश्वविजेते खेळतील.  जागतिक अजिंक्यपद पदक विजेते ऑलिम्पिकला जातील.  आम्ही इतकी वर्षे मेहनत घेत आहोत, त्याचे काय? आम्ही कुस्ती सोडून द्यावी का? विनेशला कुठल्या आधारे झुकते माप दिले जात आहे?’  - अंतिम पंघाल

Web Title: Why only the wrestler Vinesh is exempt? What's special about her!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.