आॅलिम्पिकसाठीचा निधी देताना सतर्क राहणार - राज्यवर्धनसिंग राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:09 AM2018-09-06T00:09:29+5:302018-09-06T00:19:59+5:30
२०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी निधी देताना सतर्कता बाळगण्यात येणार असून यासाठी केंद्रीय प्रक्रीया राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी दिली.
नवी दिल्ली : २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी निधी देताना सतर्कता बाळगण्यात येणार असून यासाठी केंद्रीय प्रक्रीया राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी दिली. ‘नोकरशाहीमुळे येणा-या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,‘ आम्ही खेळाडूंचे गट केले आहेत. व्यावसायिक खेळाडूंकडे लक्ष देण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. खेळाडूंना टारगेट आॅलिम्पिक पोडियम योजनेशी (टॉप्स) सरळ जोडता येण्यासाठी आम्ही पारदर्शी योजना आखली आहे. याची सुरुवात आम्ही २०१४
मध्ये केली. जे खेळाडू आॅलिम्पिकपदकाचे दावेदार आहेत त्यांना सरावासाठी निधी देता यावा हा यामागचा हेतू आहे.
राठोड पुढे म्हणाले, ‘भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी पैसे हा मुद्दा आता राहिला नाही, अनेक कार्पोरेट कंपन्या उदारमताने क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देत आहेत. आता आमच्याकडे पायाभूत सुविधेपासून उच्य कामगिरी करणाºया खेळाडूंपर्यत निधी उपलब्ध आहे.’
भारताने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत सर्वात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या आहेत याबाबत विचारले असता राठोड म्हणाले, ‘आम्ही २०२४ व २०२८ मध्ये होणाºया आॅलिम्पिकची तयारी सुरु केली आहे. आम्हाला हे विसरुन चालणार नाही. मात्र आताही आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. ‘टॉप्स’ समिती फक्त आमच्याच खेळाडूंवर लक्ष ठेवत नाहीत, तर त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष ठेवून आहेत.’ (वृत्तसंस्था)
क्रीडा क्षेत्रात बदल होतील...
आशियाई स्पर्धेत १५ सुवर्ण, २४ रौप्य व ३० कास्यपदक जिंकल्याबद्दल राठोड यांनी खेळाडूंचे कौतुक केले. यावर्षी सुरु केलेल्या खेलो इंडिया स्कूलमुळे भारतीय क्रीडाक्षेत्रात मोठे बदल होतील असेही त्यांनी सांगितले.