मिळालेल्या संधीचे सोने करणार - लोकेश राहुल
By Admin | Published: July 16, 2016 09:33 PM2016-07-16T21:33:12+5:302016-07-16T21:33:12+5:30
अंतिम संघात मात्र निवड होणे हे आपल्या हाती नसून सध्या मी हातात आलेल्या संधीचे सोने करणार आहे, असे राहुलने सांगितले आहे
>ऑनलाइन लोकमत -
बासेटेरे, दि. 16 - विंडिज दौ-यावर सध्या सातत्यपुर्ण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधलेल्या युवा फलंदाज लोकेश राहुलने संघनिवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविला असला तरी, अंतिम संघात मात्र निवड होणे हे आपल्या हाती नसून सध्या मी हातात आलेल्या संधीचे सोने करणार आहे, असे राहुलने सांगितले आहे.
विंडिज दौ-यातील दोन सराव सामन्यात दोन अर्धशतक झळकावलेल्या राहुलला २१ जुलैपासून सुरु होणा-या वेस्ट इंडिजविरुध्दच्या सामन्यासाठी भारताच्या अंतिम संघात निश्चित मानले जात आहे. मात्र याबाबतीत आपल्याला कोणतीही चिंता नसल्याचे राहुल म्हणतो. संघातील निवड माझ्याहाती नाही. एक खेळाडू म्हणून आपल्या सदैव सज्ज रहावे लागते आणि मिळालेली संधी साधण्याचा प्रयत्न करावे, असे राहुलने स्पष्ट केले.
‘‘पहिल्या कसोटी सामन्यासाठी अजून जवळपास आठवडा बाकी आहे. त्यामुळे येणा-या काही दिवसांत अंतिम संघातील खेळाडू निश्चित होतील. पण मी यासाठी चिंतातूर नसून जे व्हायचंय ते होईल. येथील परिस्थितींशी जुळून घेण्यासाठी आम्ही वेस्ट इंडिजला खूप लवकर आलो. मागील दोन डावांमध्ये मी ज्याप्रकारे खेळलो त्यावर मी आनंदी आहे. येथील खेळपट्टी कठीण असून धावा काढणे सोपे नाही. सराव सामन्यामुळे आम्हाला खूप मदत मिळाली,’’ असेही राहुलने यावेळी सांगितले.
येथील खेळपट्ट्या फिरकीला मदतशीर ठरल्या तर भारताला नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल. आमच्याकडे तीन शानदार फिरकीपटू असून तिघंही फॉर्ममध्ये आहेत. त्याशिवाय वेगवान गोलंदाजीमध्येही आमच्याकडे चांगले गोलंदाज असून येथील आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर संघाला त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.
- लोकेश राहुल