सुवर्णकन्या राहीला पदोन्नती मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 05:57 AM2018-08-24T05:57:03+5:302018-08-24T06:55:39+5:30

सध्या राही कोल्हापुरात उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत

Will Golden Kanya get promotions? | सुवर्णकन्या राहीला पदोन्नती मिळणार?

सुवर्णकन्या राहीला पदोन्नती मिळणार?

Next

पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणारी महाराष्ट्रकन्या राही सरनोबतला पदोन्नती मिळणार का, याबाबत क्रीडा क्षेत्रात उत्सुकता आहे. २७ वर्षीय राही ही सध्या कोल्हापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिच्या पदोन्नतीबाबत ‘विशेष बाब’ म्हणून प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तालयातील सुत्रांनी गुरूवारी ‘लोकमत’ला दिली.

जागतिक नेमबाजी स्पर्धा तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहीला राज्य शासनाच्या नियमानुसार थेट ‘क्लास वन’ नोकरी देण्यात आली आहे. यानंतर कामगिरीत सातत्य राखत तिने आता आशियाई स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेण्याचा पराक्रम केला आहे. क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पंजाब, हरियाणा या राज्यांत खेळाडूला शासकीय नोकरी मिळाल्यानंतर त्याने महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवल्यास पदोन्नतीसाठी त्याचा विचार केला जातो. खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी पंजाब, हरियाणा सरकार ही योजना राबविते. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूने यश मिळविल्यास त्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याचा नियम महाराष्ट्र शासनाने अलिकडेच जारी केला आहे. त्यापुढील पाऊल म्हणून खेळाडूंना अधिक चांगले यश मिळविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून उपरोक्त निर्णय घेण्याची संधी राज्य शासनाला आहे.

राहीच्या यशाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिला ५० लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. शासनसेवेत असलेल्या खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील कामगिरीवर आधारित पदोन्नती देण्याबाबत सरकारचा थेट नियम नियम नसल्याने पुणे विभागीय कार्यालयात याबाबत याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘राहीचे यश महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असून इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. शासकीय सेवेतील खेळाडूंना खेळातील कामगिरीवर आधारित पदोन्नती देण्याचा नियम नसला तरी विशेष बाब म्हणून याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे.’ यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

हे पदक खूप महत्त्वाचे - राही
केवळ आशियाई पदक म्हणून हे यश माझ्यासाठी महत्त्वाचे नसून अनेक बाबतीत हे यश माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. गेली २-३ वर्ष माझी दुखापतीमध्ये गेली आणि त्यातून सावरण्यास मला खूप वेळ लागला. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्तरावर पदक जिंकणे खूप महत्त्वाचे ठरते. अशाप्रकारचे यश मिळवण्यासाठी खूप महिन्यांचा काळ लागतो, कारण तुम्ही वर्षभर खेळापासून दूर असता. त्यामुळे एक प्रोत्साहन किंवा मला पुढील मोठ्या स्पर्धांसाठी आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी हे पदक खूप महत्त्वाचे आहे,’ अशी प्रतिक्रीया राही सरनोबतने ‘लोकमत’कडे दिली.

राहीच्या यशाचा अभिमान
राहीने मिळवलेल्या यशाबाबत आम्हाला तिचा अभिमान वाटतो. आपला आणखी एक खेळाडू जलतरणपटू वीरधवल खाडे याचे पदक हुकले. मात्र, यामुळे त्याच्या परिश्रमाचे मोल कमी होत नाही. या दोन्ही खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावून आगामी काळात देशाला आॅलिम्पिक पदके जिंकून द्यावीत, यासाठी शुभेच्छा.
- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे विभाग

Web Title: Will Golden Kanya get promotions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.