भारत करणार 2032 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी दावा?
By Admin | Published: June 16, 2017 10:49 PM2017-06-16T22:49:37+5:302017-06-16T22:49:37+5:30
जगातील शक्तिशाली देशांपैकी एक असूनही भारतात अद्याप ऑलिम्पिकचे आयोजन झालेले नाही. आता
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - जगातील सर्वात मोठी आणि मानाची क्रीडा स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक. पण जगातील शक्तिशाली देशांपैकी एक असूनही भारतात अद्याप ऑलिम्पिकचे आयोजन झालेले नाही. आता 2032 साली होणाऱ्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारताकडून दावा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी 2032च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्याबाबत चाचपणी करण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शवल्याचे सांगितले. तामिळनाडू ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामचंद्रन म्हणाले, सरकारने 2032 ऑलिम्पिक यजमानपदाच्या दावेदारीबाबत शक्यता पडताळण्यासाठी प्राथमिक परवानगी दिली आहे. मात्र हे खूप प्राथमिक अवस्थेत आहे. प्रत्यक्ष यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्यासाठी आपल्याला खूप परवानग्या मिळवाव्या लागतील.
2020 साली ऑलिम्पिकचे आयोजन जपानमधील टोकियो येथे होणार आहे, तर 2024 ची ऑलिम्पिक फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित होणार आहे. भारताकडून ऑलिम्पिक यजमानपदासाठी दावेदारी करण्यात येण्याच्या चर्चा सुरू असतात. मात्र भारत आतापर्यंत ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत उतरलेला नाही.