पुढील वर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून यशस्वी पुनरागमन करेन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:55 AM2018-09-27T03:55:25+5:302018-09-27T03:55:52+5:30
मागच्या वर्षीच्या विश्व भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण विजेती मीराबाई चानू हिने पाठदुखीमुळे यंदा विश्रांतीचा निर्णय घेतला असून पुढील एप्रिल महिन्यात आयोजित आशियाई अजिंकपदस्पर्धेद्वारे पुनरागमन करीत यश मिळविण्यावर भर दिला आहे.
नवी दिल्ली - मागच्या वर्षीच्या विश्व भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण विजेती मीराबाई चानू हिने पाठदुखीमुळे यंदा विश्रांतीचा निर्णय घेतला असून पुढील एप्रिल महिन्यात आयोजित आशियाई अजिंकपदस्पर्धेद्वारे पुनरागमन करीत यश मिळविण्यावर भर दिला आहे.
भारोत्तोलनातील भरीव कामगिरीसाठी मीराबाईला मंगळवारी राष्टÑपती भवनात देशाचा सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पाठदुखीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकलेल्या मीराबाईने नुकताच सराव सुरू केला आहे. ती म्हणाली,‘आठवडाभरापासून माझा सराव सुरू झाला. डॉक्टरांनी मला हळूहळू पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे. यासाठीच मी नोव्हेंबरमध्ये तुर्कमेनिस्तान येथे आयोजित विश्व स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये परतण्याची आशा आहे.’
ग्लास्गो राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत २ रौप्य आणि यंदा गोल्डकोस्टमध्ये सुवर्ण विजेती राहिलेल्या २४ वर्षांच्या मीराबाईने कारकिर्दिच्या सुरुवातीलाच खेलरत्न मिळेल, अशी अपेक्षा नव्हती, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (वृत्तसंस्था)
हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. करिअरमध्ये इतक्या लवकर हा मोठा पुरस्कार मिळेल, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुखद क्षण आहे.
- मीराबाई चानू, भारोत्तोलक.