मुंबई खाते उघडणार?
By admin | Published: April 19, 2015 01:10 AM2015-04-19T01:10:11+5:302015-04-19T01:10:11+5:30
सलग चार पराभवांचे तोंड पाहणाऱ्या मुंबई इंडियन्सला रविवारी आयपीएल-८ मध्ये रॉयल चॅलेजंर्स बेंगळुरूविरुद्ध विजयाचा स्वाद चाखता येईल? संघाच्या चाहत्यांना हा प्रश्न सारखा त्रस्त करीत आहे.
बेंगळुरू : सलग चार पराभवांचे तोंड पाहणाऱ्या मुंबई इंडियन्सला रविवारी आयपीएल-८ मध्ये रॉयल चॅलेजंर्स बेंगळुरूविरुद्ध विजयाचा स्वाद चाखता येईल? संघाच्या चाहत्यांना हा प्रश्न सारखा त्रस्त करीत आहे. गेल्या सत्रात मुंबईची स्थिती अशीच होती. ओळीने पाच सामने गमावल्यानंतरही या संघाने उपांत्य फेरीत धडका दिली. पण चेन्नईने नंतर त्यांना स्पर्धेबाहेर ढकलले.
विजयाचे खाते न उघडू शकलेला मुंबई एकमेव संघ आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्स पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नईने या संघाला धुतले. योग्य संयोजनाअभावी हा संघ माघारला. कर्णधार रोहित शर्मा, अॅरोन फिंच, पार्थिव पटेल आणि विंडीजचा लेंडल सिमन्स हे आघाडीचे फलंदाज फार काही करू शकले नाही.
चेन्नईविरुद्ध काल फलंदाजीत बदल करूनही यश मिळाले नव्हते. कोरी अॅन्डरसन तिसऱ्या स्थानावर आला; पण चारच धावा काढू शकला. १२ धावांत तीन गडी गमावणाऱ्या मुंबईला वरच्या स्थानावर आलेल्या भज्जीने संकटातून बाहेर काढले होते. फिंच जखमी असल्याने उद्या सिमन्सला उतरविण्याचा जुगार खेळावा लागेल. या संघाला दिलासा देणारी बाब म्हणजे रोहित, भज्जी आणि पोलार्ड हे फॉर्ममध्ये आहेत. पोलार्डने राजस्थान आणि चेन्नईविरुद्ध षटकारांचा पाऊस पाडला होता. अंबाती रायडूला अद्याप प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळालेली नाही. उद्या तो देखील उपयुक्त ठरू शकतो. गोलंदाजी मात्र फ्लॉप आहे. मलिंगाने चार सामन्यात केवळ चार गडी बाद केले व भरपूर धावा मोजल्या.