दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा विश्वकप स्पर्धेला मुकणार?
By Admin | Published: January 4, 2015 01:30 AM2015-01-04T01:30:59+5:302015-01-04T01:30:59+5:30
खांद्याच्या दुखापतीमुळे भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाचे आगामी विश्वकप खेळण्याचे स्वप्न भंग होऊ शकते
नवी दिल्ली : खांद्याच्या दुखापतीमुळे भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाचे आगामी विश्वकप खेळण्याचे स्वप्न भंग होऊ शकते. खांद्याच्या दुखापतीमुळे जडेजाला आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. खांद्याच्या दुखापतीतून जडेजा अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे त्याचे विश्वकप स्पर्धेत खेळणे जवळजवळ कठीण भासत आहे. विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड ६ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे.
आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वी सराव सत्रामध्ये जडेजाच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीला जवळजवळ सहा-सात आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जडेजाच्या स्थानी डावखुरा फिरकीपटू व अष्टपैलू अक्षर पटेलला विश्वकप संघात स्थान मिळण्याची शक्यता आले. २६ वर्षीय अष्टपैलू जडेजाने १०९ वन-डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना १६९१ धावा फटकाविल्या आहेत. दर्जेदार क्षेत्ररक्षक असलेला जडेजा वन-डे संघात उपयुक्त खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता २० वर्षीय पटेलने ९ वन-डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना एकूण ४० धावा केल्या असून, १४ बळी घेतले आहेत. पटेलने गेल्या वर्षी जून महिन्यात कारकिर्दीला प्रारंभ केला. पटेल ६ जानेवारीपासून सिडनीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी बीसीसीआय विश्वकप स्पर्धेसाठी संघ जाहीर करणार आहे. जडेजा संघाबाहेर असल्याचा लाभ नाडियाड निवासी फिरकीपटू पटेलला मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)
जडेजा गेल्या आठवड्यापासून चेन्नईजवळ पोरुरच्या एसआरएमसी कॅम्पसमध्ये नितीन पटेल व ट्रेनर रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली दुखापतीवर उपचार घेत आहे. चिकित्सकाच्या उपचारानंतरही जडेजाला आॅस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेत सहभागी होता येणार नाही. विश्वकप व तिरंगी मालिकेसाठी संघाची घोषणा ६ जानेवारी रोजी होणार आहे. निवड समिती सदस्यांना जडेजाला संघात स्थान द्यायचे किंवा नाही, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. विश्वकप स्पर्धेला १४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून, तोपर्यंत जडेजा फिट होण्याची शक्यता धूसर आहे. (वृत्तसंस्था)