जिंकणार की वाचविणार ?
By admin | Published: December 29, 2014 11:50 PM2014-12-29T23:50:03+5:302014-12-29T23:50:03+5:30
आॅस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर भारतावर एकूण ३२६ धावांची आघाडी घेतली.
रॉजर्स, मार्श यांची अर्धशतके : आॅस्ट्रेलियाला ३२६ धावांची आघाडी; शेवटच्या दिवशी भारताची कसोटी
मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर भारतावर एकूण ३२६ धावांची आघाडी घेतली. आज, सोमवारी सलामीवीर ख्रिस रॉजर्स आणि शॉन मार्श यांनी शानदार अर्धशतके ठोकल्यामुळे दुसऱ्या डावात यजमानांनी ७ बाद २६१ अशी मजल गाठली. भारताला नेहमीप्रमाणे शेपटाला गुंडाळण्यात अपयश आले. आॅस्ट्रेलिया उद्या भारताला किती लक्ष्य देते आणि ते पूर्ण करून जिंकण्यासाठी प्रयत्न करणार की कसोटी अनिर्णीत राखण्यासाठी खेळणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.
सकाळी भारताच्या तळाच्या फलंदाजांना लवकर गुंडाळल्यानंतर रॉजर्स (६९), मार्श (नाबाद ६२) आणि डेव्हिड वॉर्नर (४०) यांनी धावसंख्येला आकार दिला. उपाहारानंतर पावसामुळे ८५ मिनिटे खेळ खोळंबला. त्यामुळे दिवसाचा षटकांचा कोटा पूर्ण करण्यासाठी एक तास अतिरिक्त खेळ झाला. रेयॉन हॅरिस (८) हा मार्शसोबत खेळपट्टीवर होता. मार्शने १३१ चेंडू खेळून आठ चौकार आणि एक षट्कार खेचला. भारताकडून ईशांत शर्मा, आर. अश्विन आणि उमेश यादवने ७३ धावा देत प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारताने कालच्या ८ बाद ४६२ वरून पुढे खेळ सुरू केला. १५ चेंडूंत तीन धावांत अखेरचे दोन्ही गडी गमावताच आॅस्ट्रेलियाला ६५ धावांची आघाडी मिळाली. मोहम्मद शमी १२ आणि उमेश यादव भोपळा न फोडताच जॉन्सनच्या चेंडूवर बाद होऊन परतले. हॅरिसने ७० धावांत चार, जॉन्सनने १०३ धावांत तीन आणि लियॉनने १०८ धावांत दोन गडी बाद केले. आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाची वेगवान सुरुवात केली. १२ व्या षटकांत त्यांच्या ५० धावा झाल्या. त्यात वॉर्नरचे योगदान ३८ धावांचे होते. तो ५७ धावा काढून परतल्यानंतर रॉजर्सने २८ व्या षटकात सलग चौथे अर्धशतक गाठले. रॉजर्स आणि बर्न्स बाद झाल्यानंतरही मार्शने एक टोक सांभाळले होते. (वृत्तसंस्था)
धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ५३०, भारत पहिला डाव : मुरली विजय झे. मार्श गो. वॉटसन ६८, शिखर धवन झे. स्मिथ गो. हॅरिस २८, चेतेश्वर पुजारा झे. हॅडिन गो. हॅरिस २५, विराट कोहली झे. हॅडिन गो. जॉन्सन १६९, अजिंक्य रहाणे पायचित गो. लियॉन १४७, लोकेश राहुल झे. हेजलवुड गो. लियॉन ३, महेंद्रसिंग धोनी झे. हॅडिन गो. हॅरिस ११, रविचंद्रन अश्विन झे. आणि गो. हॅरिस ००, मोहम्मद शमी झे. स्मिथ गो. जॉन्सन १२, उमेश यादव झे. हॅडिन गो. जॉन्सन ००, ईशांत शर्मा नाबाद ००, अवांतर : २, एकूण : १२८.५ षटकांत सर्वबाद ४६५ धावा. १/५५, २/१०८, ३/१४७, ४/४०९, ५/४१५, ६/४३०, ७/४३४, ८/४६२, ९/४६२, १०/४६५. गोलंदाजी : हॅरिस २६-७-७०-४, हेजलवुड २५-६-७५-०, वॉटसन १६-३-६५-१, लियॉन २९-३-१०८-२, स्मिथ २-०-११-०.
आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : डेव्हिड वॉर्नर झे. पायचित गो. अश्विन ४०, ख्रिस रॉजर्स त्रि. गो. अश्विन ६९, शेन वॉटसन झे. धोनी गो. ईशांत १७, स्टीव्हन स्मिथ झे. रहाणे गो. यादव १४, शॉन मार्श खेळत आहे ६२, ज्यो बर्न्स झे. धोनी गो. ईशांत ९, ब्रॅड हॅडिन झे. धोनी गो. यादव १३, मिशेल जॉन्सन झे. रहाणे गो. शमी १५, रेयॉन हॅरिस खेळत आहे ८, अवांतर : १४, एकूण : ७५ षटकांत ७ बाद २६१ धावा. गडी बाद क्रम :१/५७, २/९८, ३/१३१, ४/१६४, ५/१७६, ६/२०२, ७/२३४. गोलंदाजी : यादव १४-१-७३-२, शमी २०-२-७५-१, ईशांत १९-४-४९-२, अश्विन २२-२-५६-२.
ईशांत @३००
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये एकूण ३०० बळींचा टप्पा गाठला.
ईशांतने आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९९ बळी घेतले होते.
ईशांतला आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ३२ षटकांत १०४ धावांच्या मोबदल्यात बळी घेता आला नाही. त्याने दुसऱ्या डावात आतापर्यंत १९ षटकांत ४९ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० बळींचा टप्पा गाठला.
अशी कामगिरी करणारा तो भारताचा आठवा गोलंदाज ठरला. त्याने ६१ कसोटी सामन्यांत १८७, तर ७५ वन-डे सामन्यांत १०६ बळी घेतले आहेत.
ईशांतने टी-२० क्रिकेटमध्ये ८ बळी घेतले आहेत. त्याने आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात शेन वॉटसनला बाद केले. त्याने वॉटसनला सातव्यांदा बाद करण्याची कामगिरी केली.
ईशांतने इंग्लंडच्या अॅलिस्टर कूकला आठ वेळा तंबूचा मार्ग दाखविला आहे.
सावधगिरी बाळगावी लागेल : वॉर्नर
आॅस्ट्रेलिया संघ डाव घोषित करीत प्रतिस्पर्धी संघापुढे आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्याच्या साहसी निर्णयासाठी ओळखला जातो; पण टीम इंडियाची सध्याची फलंदाजीची क्षमता बघता आॅस्ट्रेलिया संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात धावसंख्येमध्ये आणखी काही धावांची भर घालण्यास इच्छुक आहे, असे मत आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केले आहे.
सोमवारी चौथ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकारांसोबत बोलताना वॉर्नर म्हणाला, ‘आम्ही अॅडिलेड कसोटी अद्याप विसरलेलो नाही. भारतीय संघाने ३६४ धावांचे लक्ष्य गाठण्याचा कसा प्रयत्न केला होता, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. आम्हाला या लढतीत आणखी काही धावांची भर घालण्याची गरज आहे.’
आॅस्ट्रेलियाकडे सध्या एकूण ३२६ धावांची आघाडी असून, त्यांच्या तीन विकेट शिल्लक आहेत. आॅस्ट्रेलिया संघ पाचव्या दिवशी या आघाडीमध्ये आणखी काही धावांची भर घालण्यास उत्सुक आहे. अॅडिलेडमध्ये भारतीय संघाने संघर्षपूर्ण खेळ केला होता. आम्ही योग्यवेळी बळी घेतल्यामुळे नशीबवान ठरलो, अन्यथा निकाल वेगळा लागला असता, असेही वॉर्नर म्हणाला.
विराट कोहलीच्या विकेटचा उल्लेख करताना वॉर्नर म्हणाला, ‘जर विराट खेळपट्टीवर टिकला असता, तर भारताने १-० अशी आघाडी घेतली असती. आम्हाला भारताच्या फलंदाजीच्या बाजूची चांगली कल्पना आहे. विराट व अजिंक्य रहाणे यांनी या सामन्यात पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली.’
आक्रमकतेमुळे नुकसानही होऊ शकते : गावसकर
नवी दिल्ली : स्टार फलंदाज विराट कोहली सध्या मैदानावर आणि मैदानाबाहेर आपल्या आक्रमकतेमुळे चर्चेत आहे; मात्र त्याच्या या आक्रमकतेमुळे भारताचे नुकसानसुद्धा होण्याची शक्यता आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर याने व्यक्त केले आहे़ भारत आणि आॅस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा कोहली आणि मिशेल जॉन्सन यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसून आले़ यावर भाष्य करताना गावसकर म्हणाला, कोहलीला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी डिवचले तर तो त्याचे उत्तर देणारच, यात शंका नाही; मात्र त्याने आॅस्ट्रेलियन खेळाडूंविरुद्धच्या वादाची
सुरुवात करू नये़
कोहली-जॉन्सन यांच्यादरम्यान वाक् युद्ध कायम
मैदानावर आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त करणाऱ्या भारतीय उपकर्णधार विराट कोहलीने आज पुन्हा एकदा मिशेल जॉन्सनला ‘टार्गेट’ केल्याचे चित्र दिसले. जॉन्सन बाद झाल्यानंतर तंबूत परतत असताना विराटने टिप्पणी केली. ही घटना आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील ६८ व्या षटकादरम्यान घडली. मोहम्मद शमीने जॉन्सनला बाद केले. त्यानंतर कोहलीने जॉन्सनला काहीतरी म्हटले. तंबूत परतत असताना जॉन्सननेही काहीतरी उत्तर दिले; पण ते स्पष्ट झाले नाही. त्याने कोहलीला काहीतरी म्हटले किंवा पंचांकडे तक्रार केली असावी. कारण त्यानंतर मैदानावरील दोन्ही पंचांनी भारतीय उपकर्णधारसोबत चर्चा केली.
लक्ष्याचा पाठलाग करणे मुश्कील : आर. अश्विन
आॅस्ट्रेलियाने ३२६ धावांची आघाडी मिळवली असली तरी भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरण सकारात्मक आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली. पाचव्या व अखेरच्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करणे अडचणीचे ठरू शकते, असेही अश्विन म्हणाला. तो म्हणाला, ‘सामन्याचा निकाल काय लागेल, याची आम्हाला कल्पना नाही; पण आम्ही सकारात्मक आहोत. उद्या, मंगळवारी सकाळच्या सत्रात आॅस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजांना झटपट माघारी परतवत लक्ष्य निश्चित करू. आम्ही सकारात्मक विचार करीत असून, काय घडते याबाबत उत्सुकता आहे. अखेरच्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण असते.’