विजयाची लय गुजरात लायन्स कायम राखणार?
By admin | Published: April 29, 2017 12:48 AM2017-04-29T00:48:22+5:302017-04-29T12:41:11+5:30
रॉयल चॅलेंजर्सला पराभूत केल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या गुजरात लायन्सचा सामना शनिवारी बलाढ्य मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.
राजकोट : रॉयल चॅलेंजर्सला पराभूत केल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या गुजरात लायन्सचा सामना शनिवारी बलाढ्य मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यातही गुजरात आपली विजयाची लय कायम राखणार का, याची उत्सुकता आहे.
गुजरातचा कर्णधार सुरेश रैनाने आरसीबी विरुद्ध ३० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या होत्या. मात्र क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे या सामन्यासाठी सुरेश रैना पूर्णपणे तंदुरुस्त असेल का, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. रैनाने आतापर्यंत ३०९ धावा केलेल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने आठपैकी सहा सामने जिंकले आहेत, तर गुजरातने फक्त तीनच सामने जिंकले आहेत. मुंबईला दोन्ही सामन्यात पुणे सुपरजायंट्सकडून पराभूत व्हावे लागले आहे. पुढील दोन सामने जिंकून प्ले आॅफ मधील आपले स्थान नक्की करण्यासाठी मुंबई आपले कौशल्य पणाला लावेल.
दुसरीकडे गुजरातला पुढील सहापैकी पाच सामन्यांत विजय संपादन करावा लागणार आहे. ड्वेन ब्राव्होच्या दुखापतीचा गुजरातला फटका बसला आहे. मात्र जेम्स फॉकनर व अॅँड्र्यू टाये याने गोलंदाजीत विविधता दाखवली आहे. फलंदाजीत मॅकूलम व अॅरॉन फिंचने प्रभावी कामगिरी केली आहे. यॉर्करचा प्रभावी मारा करणारा बासिल थम्पीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मधल्या फळीत दिनेश कार्तिकनेही चमकदार कामगिरी केली आहे.
गुणवत्तेचा विचार केल्यास मुंबई इंडियन्स खूपच पुढे आहे. जोस बटलर, कर्णधार रोहित शर्मा व किरॉन पोलार्ड हे कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतात. हार्दिक पंड्यानेही चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजीत मिशेल जॉन्सन व मिशेल मॅक्लेनघन यांनी प्रभावी मारा केलेला आहे. हरभजन सिंगला आतापर्यंत चारच बळी मिळवता आले आहेत, पण प्रतिस्पर्ध्यांच्या धावांवर अंकुश ठेवण्यात मात्र तो यशस्वी ठरला आहे. (क्रीडा प्रतिनिधी)