विल्यम्स बहिणींनी जिंकले सहावे विम्बल्डन दुहेरीचे विजेतेपद
By admin | Published: July 10, 2016 07:17 PM2016-07-10T19:17:23+5:302016-07-10T19:17:23+5:30
जागतिक क्रमवारीतील नंबर वन महिला खेळाडू सेरेना विल्यम्सने विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद पटकावल्यानंतर व्हिनस विल्यम्सच्या साथीने महिला दुहेरीत चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १० : जागतिक क्रमवारीतील नंबर वन महिला खेळाडू सेरेना विल्यम्सने विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद पटकावल्यानंतर व्हिनस विल्यम्सच्या साथीने महिला दुहेरीत चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला.
जवळपास दोन वर्षांनंतर बरोबर खेळणाऱ्या अमानांकित सेरेना अणि व्हिनस जोडीने हंगेरीच्या तिमिया बाबोस आणि कजाखिस्तानच्या यारोस्लाव्हा श्वेदोव्हा या जोडीवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला. विल्यम्स बहिणींचे हे एकमेकींच्या साथीने सहावे विम्बल्डन विजेतेपद ठरले. त्याचबरोबर सेरेनाने विम्बल्डनमध्ये दुहेरी मुकुट पटकावला. तिच्या कारकीर्दीत विम्बल्डनमध्ये ही कामगिरी करण्याची चौथी वेळ आहे. त्याआधी सेरेनाने जर्मनीच्या अँजेलिक केर्बर हिचा पराभव करीत महिला एकेरीच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. ते तिचे विम्बल्डनमधील एकेरीचे सातवे विजेतेपद आणि एकूण २२ वे विजेतेपद ठरले.
महिला दुहेरीतील विजेतेपदाबरोबरच विल्यम्स बहिणींचे ग्रँडस्लॅम दुहेरीच्या फायनलमधील रेकॉर्ड १४-0 असे झाले आहे. सेरेनाची मोठी बहीण व्हिनससाठी हे विजेतेपद दिलासादायक ठरले आहे. कारण तिला एकेरीत उपांत्य फेरीत केर्बरकडून पराभव पत्करावा लागला होता.