विम्बल्डन: ब्रिटनच्या अँडी मरेला पुरुष एकेरीचे जेतेपद
By admin | Published: July 10, 2016 09:35 PM2016-07-10T21:35:37+5:302016-07-10T22:40:11+5:30
पहिल्या दोन सेटमध्ये मरेने सरळ आघाडी घेतल्यानंतर मिलॉस रावनिचने त्याला कडवी झुंज दिली. पण मरेच्या तुफानी खेळी पुढे त्याची झुंज अपयशी ठरली.. मरेने ६-४, ७-६, ७-६ अशा सरळ सेटमध्ये त्याने बाजी मारली.
ऑनलाइन लोकमत
दोन तास ४८ मिनिटे रंगलेल्या रोमहर्षक लढतीत द्वितीय मानांकित मरे याने सहाव्या मानांकित राओनिक याचे आव्हान ६-४, ७-६, ७-६ असे उद्ध्वस्त करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भेदक आणि वेगवान सर्व्हिससाठी प्रसिद्ध असणारा कॅनडाचा राओनिक त्याचे नाव इतिहासात नोंदवण्यापासून फक्त एक पावलाने वंचित राहिला.
मरे याला कॅनेडियन खेळाडूने कडवी झुंज दिली; परंतु ब्रिटिश खेळाडूने आपला अनुभव आणि कौशल्य पणाला लावत दुसऱ्यांदा विजेतेपदाचा बहुमान मिळवला. याआधी मरे २0१३ मध्ये येथे चॅम्पियन बनला होता.
२९ वर्षीय मरे याने पहिला सेट ६-४ असा जिंकला. त्यानंतर त्याला पुढील दोन सेट जिंकण्यासाठी खूपच परिश्रम घ्यावे लागले. राओनिकने मरे याला कडवी झुंज दिली; परंतु मरे याने टायब्रेकपर्यंत खेचले गेलेले दोन्ही सेट जिंकले. त्याने दुसरा सेट टायब्रेकमध्ये ७-३ आणि तिसरा सेटदेखील टायब्रेकमध्ये ७-२ असा जिंकला.