विम्बल्डन - उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदाल पराभूत
By admin | Published: July 11, 2017 11:37 AM2017-07-11T11:37:24+5:302017-07-11T11:40:12+5:30
विम्बल्डन स्पर्धेचा गतविजेत्या असलेल्या स्पेनच्या राफेल नदाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
ऑनलान लोकमत
विम्बल्डन, दि. 11 - विम्बल्डन स्पर्धेचा गतविजेत्या असलेल्या स्पेनच्या राफेल नदाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यंदाच्या जेतेपदाच्या दावेदारांपैकी एक असलेल्या राफेल नदालला चौथ्या फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. पाच सेटच्या थरारक सामन्यात लक्झेम्बर्गच्या जाइल्स मुलरनं नदालचा 6-3, 6-4, 3-6, 4-6, 15-13 असा पराभव करत पहिल्यांदाच विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.पहिले दोन सेट गमावणाऱ्य़ा नदालने आक्रमक खेळ करत सामन्यात पुनरागमन केले. नदालने तिसरा सेट 3-6 ने आणि चौथा सेट 4-6 ने जिंकत सामन्यात रंगत निर्माण केली. पण पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये 14 व्या मानांकित जाइल्स मुलरनं आपला खेळ आधिक उंचावत नदालचा पराभव केला.
दुखापतीमुळे 2016 च्या विम्बल्डन स्पर्धेतून त्याने माघारी घेतली होती. तर 2013 मध्ये विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की रफाएल नदालवर ओढवली होती. त्याआधीच्या वर्षी तो दुसऱ्या फेरीत गारद झाला होता. गेल्या पाच वर्षांत त्याला विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नव्हती.
फेडरर, मरे उपांत्यपूर्व फेरीत
दिग्गज टेनिसपटू स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने एकतर्फी झालेल्या सामन्यात सहज बाजी मारताना कारकिर्दीत तब्बल 12व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित ब्रिटनच्या अँडी मरेने दमदार विजयासह सलग दहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. संभाव्य विजेत्या फेडररने नियंत्रित खेळ करताना बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवला ६-४, ६-२, ६-४ असे सहज नमवले. दिमित्रोवने काही वेगवान सर्विस आणि जोरदार फटक्यांच्या जोरावर कसलेल्या फेडररपुढे क्वचितच आव्हान उभे केले. त्याच वेळी, मरेला फ्रान्सच्या बेनॉइट पेरविरुद्ध विजयासाठी पहिल्या सेटमध्ये काहीसे झुंजावे लागले. मात्र, जम बसल्यानंतर मरेने उत्कृष्ट खेळ करताना बेनॉइटचे आव्हान ७-६(७-१), ६-४, ६-४ असे परतावले.
सानिया पराभूत...
कर्स्टन फ्लिपकेन्ससह खेळत असलेल्या सानिया मिर्झाचे महिला दुहेरीत आव्हान संपुष्टात आले. सानिया - कर्स्टन यांना मार्टिना हिंगिस - युंग जान चेन यांच्याविरुध्द २-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला.