विम्बल्डन : सेरेना विलियम्स अंतिम फेरीत, सानिया - हिंगीसचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 07:36 PM2016-07-07T19:36:58+5:302016-07-07T19:36:58+5:30
महिला दुहेरीमध्ये मात्र धक्कादायक निकालाची नोंद झाली. भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल जोडीला उपांत्यपुर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला
सेरेना विलियम्स अंतिम फेरीत
लंडन : जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने अपेक्षित कामगिरी करताना विम्बल्डन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर सेरेनाने रशियाच्या एलेना वेस्नीनाचा सरळ दोन सेटमध्ये फडशा पाडला. त्याचवेळी अव्वल महिला जोडी सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस यांचे आव्हान उपांत्यपुर्व फेरीत धक्कादायकरीत्या संपुष्टात आले.
एकतर्फी झालेल्या सामन्यात सेरेनाना जबरदस्त वर्चस्व राखताना केवळ ४८ मिनिटांमध्ये बाजी मारली. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना नियंत्रण राखलेल्या सेरेनाने सलग दोन सेटमध्ये वेस्नीनाला ६-२, ६-० असे लोळवले. या विजयासह जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून सेरेना एक पाऊल दूर आहे.
पहिल्या सेटमध्ये २ गेम जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या वेस्नीनाचा दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाच्या धडाक्यापुढे काहीच निभाव लागला नाही. यावेळी सेरेनाने ताकदवर फटक्यांच्या जोरावर वेस्नीनाला एकही गेम जिंकण्याची संधी न देता दिमाखात अंतिम फेरी गाठली. (वृत्तसंस्था)
.......................................
सानिया - हिंगीस पराभूत...
महिला दुहेरीमध्ये मात्र धक्कादायक निकालाची नोंद झाली. भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल जोडीला उपांत्यपुर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. पाचव्या मानांकीत तिमिया बाबोस (हंगेरी) आणि यारोस्लावा श्वेदोवा (कजाकिस्तान) या जोडिने शानदार खेळ करताना एक तास नऊ मिनिटांच्या लढतीत ६-२, ६-४ असा विजय मिळवला. सुरुवातीपासूनच झगडणाऱ्या सानिया - हिंगीस आपल्या लौकिकानुसार खेळ करण्यात सपशेल अपयशी ठरल्या. याआधीच मिश्र दुहेरीतून स्पर्धेबाहेर गेलेल्या सानियाचा विम्बल्डन प्रवास या पराभवानंतर संपुष्टात आला आहे.