व्हीसीएवर यॉर्करच्या बळावर मालिका जिंकू
By admin | Published: January 29, 2017 04:54 AM2017-01-29T04:54:08+5:302017-01-29T04:54:08+5:30
पाचव्या वन -डेपाठोपाठ कानपूरचा पहिला टी-२० सामना जिंकून आमचा संघ फॉर्ममध्ये परतला. ही लय कायम ठेवून व्हीसीएवर यॉर्करच्या बळावर मालिका विजयाचा विश्वास ‘डेथ
नागपूर : पाचव्या वन -डेपाठोपाठ कानपूरचा पहिला टी-२० सामना जिंकून आमचा संघ फॉर्ममध्ये परतला. ही लय कायम ठेवून व्हीसीएवर यॉर्करच्या बळावर मालिका विजयाचा विश्वास ‘डेथ ओव्हर’मध्ये टिच्चून मारा करणारा तज्ज्ञ गोलंदाज अशी ओळख बनलेला ख्रिस जॉर्डन याने व्यक्त केला.
दुसऱ्या टी-२० च्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना जॉर्डन म्हणाला, ‘‘उद्याचा सामना जिंकून मालिका खिशात घालणे ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी असेल. मी ‘वाईड यॉर्कर’ टाकण्यावर फार मेहनत घेतली आहे. वाईड यॉर्कर चेंडू डेथ ओव्हरमधील माझे सर्वांत मोठे शस्त्र आहे.’’
कानपूरच्या पहिल्या सामन्यात अशाच चेंडूवर मी लोकेश राहुलला बाद केले. बंगळुरू येथे राहुलसोबतखेळताना नेटवर त्याला खूप गोलंदाजी केली असून तो माझा चांगला मित्र आहे. आठ कसोटी, तसेच ३१ वन-डे खेळलेल्या जॉर्डनला टी-२० संघात स्थान देण्यात आले. यावर तो म्हणाला, ‘‘संघात पुनरागमनाचा आनंद वेगळाच असतो. वन-डे संघात माझा समावेश नव्हता. बिग बॅश खेळून थेट टी-२० मालिकेसाठी संघासोबत जुळल्याने मनात धाकधूक होती, पण गोलंदाजीत यश मिळाल्याने उत्साह वाढला आहे.’’
आगामी विंडीज दौऱ्यासाठी इंग्लंडच्या वन-डे संघात जॉर्डनचा समावेश करण्यात आलेला नाही. याबद्दल विचारताच जॉर्डन म्हणाला, ‘‘मी केवळ ५० षटकांच्या सामन्यांसाठीच नव्हे, तर कसोटी संघात पुनरागमन करण्यास इच्छुक आहे.’’(क्रीडा प्रतिनिधी)
आयपीएलमध्ये
संधी मिळेल!
मागच्या वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा जॉर्डन यंदा पुन्हा लिलावाद्वारे संधी मिळेल, याबद्दल उत्सुक आहे. बार्बाडोसमध्ये जन्मलेला जॉर्डन म्हणाला, ‘‘मी लिलावात सहभागी होणार आहे. मानसिकरीत्या खेळाडू म्हणून पुढे येण्यास मदत मिळाल्याने आयपीएलमध्ये कामगिरी करण्याचे फार दडपण असते. मी या स्पर्धेत सहभागी होण्यास सज्ज आहे. बंगळुरूकडून खेळताना आम्ही अंतिम फेरी गाठली होती. आता एक पाऊल पुढे टाकू.’’
च्क्रिकेटचे तंत्र सुधारण्यासह स्पर्धात्मक वातावरणासाठी सज्ज करणारी आयपीएल महत्त्वपूर्ण स्पर्धा असल्याचे जॉर्डनचे मत आहे.