विंडीज पदाधिकाऱ्यांनी पावले उचलणे आवश्यक
By admin | Published: July 2, 2017 12:10 AM2017-07-02T00:10:58+5:302017-07-02T00:10:58+5:30
पहिली लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यानंतर खेळल्या गेलेल्या दोन लढतींमध्ये भारताने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले. विंडीज क्रिकेटच्या
-सौरव गांगुली
पहिली लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यानंतर खेळल्या गेलेल्या दोन लढतींमध्ये भारताने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले. विंडीज क्रिकेटच्या समृद्ध भूतकाळाचा विचार केल्यानंतर त्यांचा घसरत जाणारा आलेख बघणे जागतिक क्रिकेटसाठी चांगली बाब नाही. येथील क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी विंडीज क्रिकेटला पुन्हा रुळावर आणण्यासाठी कंबर कसून कामाला लागण्याची गरज आहे. विंडीजच्या नैसर्गिक आक्रमक क्रिकेटविना जागतिक क्रिकेटची रंगत काही प्रमाणात नक्कीच ओसरेल. विंडीज क्रिकेटचा आलेख उंचावण्यासाठी काय करता येईल, यासाठी कॅरेबियन क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी लवकर पावले उचलण्याची गरज आहे.
दोन लढतींमध्ये अजिंक्य रहाणेची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. पाचही लढतींमध्ये आपण खेळणार आहोत, याची त्याला चांगली कल्पना आहे आणि त्याची झलक त्याच्या खेळामध्ये दिसून आली. कोहलीने रहाणेसारख्या खेळाडूसोबत चर्चा करायला हवी आणि त्याला संघातील त्याची भूमिका समजावून सांगायला हवी. त्यामुळे रहाणेसारख्या खेळाडूला आपला खेळ उंचावता येईल आणि त्याला त्याचे संघातील महत्त्वही कळेल.
चर्चेचा दुसरा मुद्दा म्हणजे कुलदीप यादव आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. विशेषत: पाटा खेळपट्टीवर त्याची गोलंदाजी संघासाठी जमेची बाजू ठरू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान पाटा खेळपट्ट्यांवर भारतीय फिरकीपटू निष्प्रभ भासले. त्यामुळे फिरकीला अनुकूल नसलेल्या खेळपट्ट्यांवर संघात कुलदीपसारख्या गोलंदाजाची गरज असते. गोलंदाजीतील विविधतेमुळे कुलदीप भारतीय वन-डे संघातील महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. सध्याची परिस्थिती बघता भारतीय संघाने या मालिकेत ४-० ने बाजी मारली तर आश्चर्य वाटणार नाही. वेस्ट इंडिज संघाबाबत अधिक चर्चा करण्यासारखे नाही. सध्याचा विंडीज संघ या मालिकेत काही चमत्कार घडवेल, असे वाटत नाही. विंडीजचे क्रिकेट प्रेम जगजाहीर असताना स्टेडियममधील रिकाम्या खुर्च्या बघितल्यानंतर दु:ख वाटते. अनेक लोककला लाभलेल्या या बेटांवर कॅलिस्पोचे धुंद करणारे बिट कानावर पडले नाहीत तर चुकल्यासारखे वाटते. (गेमप्लॅन)