अफगाणिस्तानचा विंडीजला धक्का

By admin | Published: March 28, 2016 03:33 AM2016-03-28T03:33:58+5:302016-03-28T03:33:58+5:30

अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषकाच्या समारोपाच्या सामन्यात रविवारी कमाल केली. ओळीने तिन्ही सामने जिंकून ‘ग्रुप एक’मध्ये टॉपवर असलेल्या वेस्ट इंडिजला विदर्भ क्रिकेट

Windies push Afghanistan | अफगाणिस्तानचा विंडीजला धक्का

अफगाणिस्तानचा विंडीजला धक्का

Next

- किशोर बागडे,  नागपूर
अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषकाच्या समारोपाच्या सामन्यात रविवारी कमाल केली. ओळीने तिन्ही सामने जिंकून ‘ग्रुप एक’मध्ये टॉपवर असलेल्या वेस्ट इंडिजला विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर या युवा संघाने सहा धावांनी पाणी पाजले. हा विजय अफगाणिस्तानसाठी चॅम्पियन बनल्यासारखाच होता. विंडीजला पराभवाचा फारसा फटका
बसला नसला, तरी अपराजित राहण्याच्या त्यांच्या आशा मात्र धुळीस मिळाल्या आहेत.
पुरेसा अनुभव नसलेल्या या संघाने फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनादेखील चकित करीत विजयी नृत्यासह आनंदी निरोप घेतला. या सामन्याचा हिरो ठरला तो नजीबुल्लाह जदरान. त्याने एकाकी संघर्ष करीत नाबाद ४८ धावांच्या बळावर २० षटकांत ७ बाद १२३ पर्यंत मजल गाठून दिली. त्यानंतर अखेरच्या षटकांत तिसऱ्या चेंडूवर कार्लोस ब्रेथवेटचा सीमारेषेवर अप्रतिम झेल घेत विंडीजला २० षटकांत ८ बाद ११७ धावांत रोखून विजयावर कळस चढविला. अफगाणिस्तानला विजयाचे जितके श्रेय जाते, तितकाच विंडीज संघ पराभवास जबाबदार ठरला.
मधल्या फळीतील एकाही फलंदाजाने जबाबदारीने खेळी केली नाही.
ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक २८ धावांचे योगदान दिले. मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी दोन तसेच हमजा, हसन आणि नेब यांनी एकेक गडी बाद केला.
३८ धावांत पहिले तिन्ही फलंदाज गमावल्यानंतरही त्यांना बोध घेता आला नाही. पदार्पण करणारा सलामीवीर लेविस शून्यावर बाद झाला. १५ चेंडूंत दोन षटकार व एका चौकारासह २२ धावा कढणाऱ्या जॉन्सन चार्ल्सची हमीद हसनने दांडी उडविली. आंद्रे फ्लेचरने दहा धावा केल्यानंतर त्याच्या पायात लचक भरल्याने तो निवृत्त होऊन परतला. मर्लोन सॅम्युअल्सला (५) राशिद खानने फिरकीच्या जाळ्यात ओढून त्रिफळाबाद केले. ब्राव्हो-रामदीन यांनी चौथ्या गड्यासाठी ४६ चेंडूंत ४१ धावांची भागीदारी करीत पडझड थांबविली. ब्राव्हो २८ धावा काढून परतल्यानंतर रामदीन (१८) राशिदच्या चेंडूवर यष्टिचित होताच विंडीजचा अर्धा संघ ८९ धावांत बाद झाला. विजयासाठी अखेरच्या २४ चेंडूंत ३५ धावांची गरज होती. १७ व्या षटकांत विंडीजला सहा धावा घेता आल्या.

एव्हिन लेविसचे पदार्पण
वेस्ट इंडिजचा युवा डावखुरा सलामीवीर एव्हिन लेविस याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विंडीजचे महान खेळाडू क्लाईव्ह लॉईड यांनी त्याला सामन्यापूर्वी कॅप प्रदान केली.
२४ वर्षांचा लेविस व्हीसीएवर पदार्पणात भोपळाही न फोडता झेलबाद झाला.

अफगाण संघाचा जल्लोष!
विजयावर शिक्कमोर्तब होताच अफगाण संघातील खेळाडूंनी नृत्य करीत मैदानावर जल्लोष केला. अफगाणिस्तानचे पत्रकार आणि
रेडियो समालोचक एकमेकांना आलिंगन देत विजयाचा आनंद
साजरा करीत होते. अफगाणिस्तान संघाने जल्लोषानंतर छायाचित्रदेखील काढून घेतले.

Web Title: Windies push Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.